१२ गडकिल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत!

yongistan
By - YNG ONLINE
मिळणार जागतिक वारसा स्थळाचा दर्जा, शिष्टमंडळ पॅरिसमध्ये दाखल
मुंबई : प्रतिनिधी 
छत्रपती शिवरायांच्या १२ गड आणि किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी १२ गड आणि किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ रविवार, दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पॅरिसमध्ये दाखल झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह्याद्री कडेकपारीतील जिता जागता इतिहास असलेल्या मावळ प्रांतातील जु्न्नर येथील शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यापासून ते स्वराज्याची पहिली आणि दुसरी राजधानी असलेल्या राजगड आणि रायगड किल्ल्यांसह १२ किल्लांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळावे, यासाठी आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले असून वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना हे शिष्टमंडळ रविवारी भेटले.
महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या राजे शिव छत्रपतींच्या १२ गडकिल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळामध्ये नामांकन झाले आहे, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. 
मराठा लष्करी भूप्रदेश 
संकल्पनेअंतर्गत प्रस्ताव
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’  या संकल्पनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ पॅरिसला गेले आहे. 
या किल्ल्यांचा समावेश
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.