रोहित, विराटची विक्रम

yongistan
By - YNG ONLINE
पांड्याचीही विक्रमी खेळी
दुबई : वृत्तसंस्था 
भारतीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने रविवार, दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला. रोहितने आज खाते उघडताच एकदिवसीय सामन्यात ९ हजार धावांचा टप्पा ओलांडत सचिन तेंडुलकरला मागे टाकले. रोहित २०१३ पासून नियमित सलामीवीर म्हणून खेळत आहे. तेव्हापासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापाठोपाठ एक मोठे विक्रम केले. आज त्याने ९ हजार धावा पूर्ण केल्या.
रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात खाते उघडताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ९ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ १८१ डावात ९ हजार धावांचा टप्पा ओलांडला. सर्वात कमी डावांमध्ये ९ हजार धावांचा आकडा गाठत त्याने नवा विश्वविक्रम केला. याआधी भारतीय क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने १९७ डावांमध्ये ९ हजार धावांचा टप्पा गाठला होता. आता रोहित शर्माने हा विक्रम मोडून आपल्या नावावर केला. 
रोहितने सचिनशिवाय सौरव गांगुली, ख्रिस गेल, अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि सनथ जयसूर्यालाही त्याने मागे टाकले. सौरव गांगुलीने २३१ डाव, ख्रिस गेलने २४६ डाव, अ‍ॅडम गिलख्रिस्टने २५३ डाव आणि सनथ जयसूर्याने २६८ डावांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ९ हजार धावा पूर्ण केल्या.
विराटचाही विक्रम
विराटनेही पाकिस्तानविरुद्ध दुबईत झालेल्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा करणारा कोहली जगातील पहिला खेळाडू बनला. त्याने २९९ व्या एकदिवसीय सामन्याच्या २८७ व्या डावात ही कामगिरी केली. दुबईत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने ४३ व्या षटकातील दुस-या चेंडूवर चौकार मारून हा विक्रम केला. या आधी सचिनने ३५० डावांत हा विक्रम नोंदवला होता. सचिननंतर श्रीलंकेचा कुमार संगकाराने ३७८ डावात १४ हजार धावा केल्या होत्या. आता कोहलीच्या नावे हा विक्रम नोंदला गेला. याच सामन्यात विराटने अखेरच्या क्षणी चौकार मारून शतक ठोकले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय सामन्यातील ८२ वे आणि एकदिवसीय सामन्यातील ५१ वे शतक ठरले.
पांड्याचे २०० विकेट
अष्टपैलू भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये २०० विकेटचा पल्ला गाठला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुसरी विकेट घेताच त्याच्या नावावर हा विक्रम रचला आहे. सउद शकीलला ६२ धावांवर बाद केले आणि तोच त्याचा २०० वा विकेट ठरला.