प्रयागराज : प्रतिनिधी
१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या दरम्यान प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा पार पडला. महाशिवरात्रीच्या रात्री या महाकुंभमेळ््याची सांगता झाली. एकूण दीड महिन्यात ६६ कोटी भाविकांनी स्रान केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र आणि अखेरच्या दिवशी जवळपास ८१ लाख लोकांनी स्नान केले. स्रान करणा-या भाविकांवर अखेरच्या दिवशी पाचवेळा हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
महाकुंभ मेळ्यात ६६ कोटी भाविकांनी स्नान केले असे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. सुमारे सहा आठवड्यांपूर्वी म्हणजेच १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झालेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ््याची सांगता २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर झाली. अखेरच्या दिवशी महाकुंभ मेळयात अमृतस्नान पार पडले. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत हजारो लोक त्रिवेणी संगम येथे पवित्र स्रान करण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. भाविकांची संख्या ट्रॅक करण्यासाठी एआय-सक्षम कॅमेरे आणि सीसीटीव्ही यांसह प्रगत तंत्रज्ञान तैनात करण्यात आले होते.
दुर्मीळ खगोलीय संरेखनामुळे १४४ वर्षांनंतर ६ आठवड्यांचा महाकुंभ मेळा आला. त्रिवेणी संगम (गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम) येथे या काळात स्रान केल्याने एखाद्या व्यक्तीची पापे धुऊन जातात आणि त्यांचे कर्म सुधारते, अशी मान्यता आहे.
आता पुढील पूर्ण कुंभमेळा २०२७ मध्ये महाराष्ट्रात नाशिक येथे होणार आहे. नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या त्र्यंबकेश्वर भागात ‘सिंहस्थ कुंभमेळा’ भरणार आहे. त्यानंतर २०२८ मध्ये उज्जैनमध्ये सिंहस्थ महाकुंभ तर २०३० मध्ये प्रयागराजमध्ये अर्धकुंभ आयोजित करण्यात येणार आहे.