छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे पुरस्कार
मुंबई : प्रतिनिधी
कवी मनाचे महान योध्दे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून दिला जाणार पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादी मी अनंत मी.. या गीताला जाहीर झाला. या पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किना-यावरुन आज केली.
ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात, त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. २ लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी माहिती ही अॅड. आशिष शेलार यांनी दिली. छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षीपासून प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे.