ट्रम्पराजमुळे ४ महिन्यात भारतीयांचे ४६ लाख कोटी पाण्यात

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेने शुल्क लादल्यानंतर आणि चीनने प्रत्युत्तर दिल्यानंतर जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे १९ लाख कोटी रुपये काही मिनिटांतच बुडाले. धक्कादायक बाब म्हणजे ट्रम्प सत्तेवर आल्यापासून त्यांच्या निर्णयांमुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ४६ लाख कोटी रुपयांची घट झाली. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यापासून म्हणजेच २० जानेवारीपासून भारताचे बाजार भांडवल ४,३१,५९,७२६ कोटी रुपयांवरून ३,८६,०१,९६१ कोटी रुपयांपर्यंत खाली घसरले. सोमवारीही याचे पडसाद उमटले. शेअर बाजार सुरू होताच मोठा भूकंप झाला. कारण बाजार उघडताच सेन्सेक्स ३००० अंकांनी खाली पडला. निफ्टीमध्ये पण ९०० अंकांनी मोठी घट झाली. त्यामुळे सोमवारीदेखील भारतीय गुंतवणूकदारांचे तब्बल १९ लाख कोटी बुडाले. सायंकाळी काही अंशी बाजार सावरला असला तरी आजची घसरण अभूतपूर्व असल्याने भारतीय गुंतवणूकदारांना याची मोठी किंमत मोजावी लागली. जागतिक स्तरावर अनिश्चिततेमुळे बाजार कमालीच्या अस्थिरतेतून जात आहे. 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी टॅरिफ पॉलिसी जाहीर केली आणि इतर देशांवर मोठें आयात शुल्क लागू केले. त्यामुळे केवळ अमेरिकेतच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही खळबळ उडाली. शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक गुंतवणूक बँकांनी मंदीची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली. जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार अमेरिका आणि संपूर्ण जगात मंदीची शक्यता ६० टक्क्यांवर पोहोचली आहे.

जागतिक बाजारात हाहाकार
आशियातील इतर देशांमध्ये हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ११ टक्के, जपानचा निक्केई २२५ जवळपास ७ टक्के, चीनचा शांघाय एसएसई कंपोझिट निर्देशांक ६ टक्क्यांहून अधिक आणि कोरियाचा कोस्पी ५ टक्क्यांनी घसरला. गेल्या आठवड्यात अवघ्या दोन दिवसांत अमेरिकेच्या शेअर बाजारात ५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली.
महागाई वाढणार
व्यापारयुद्धाची धग आता अमेरिकन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचली आहे. अशीच स्थिती राहिल्यास संपूर्ण जगासाठी आर्थिक अडचणी वाढू शकतात. भारतासारख्या देशालाही याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे जगभरात महागाईच्या झळा अतिशय तीव्र होणार आहेत. यातून सर्वसामान्य माणूस भरडला जाणार आहे.