घरगुती गॅस महागला, महागाईचा भडका

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत २ रुपयांची वाढ केल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासूनच ही वाढ लागू करण्यात आली आहे. उज्ज्वला योजने अंतर्गत असलेल्या ग्राहकांनाही हा निर्णय लागू असणार आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज सांगितले. जगभरात शेअर बाजारात हाहाकार उडालेला असताना केंद्र सरकारने भारतीयांच्या खिशावर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढविल्याने आता आता या गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये झाली आहे. तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅसची किंमतही वाढविण्यात आल्याने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या सिलेंडरची किंमत आता ५०० रुपयांवरून ५५० रुपये झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. आयात शुल्कवाढीचा अख्ख्या जगात परिणाम होणार असे म्हटले जात असताना आता त्याची झळ थेट सर्वसामान्यांना बसू लागली आहे. 
मध्यरात्रीपासूनच दर लागू
नवीन किमती सोमवारी मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आल्या. तेल कंपन्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. त्यामुळे आता ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या
उत्पादन शुल्कात वाढ
कच्चे तेल स्वस्त होऊनही सामान्यांची निराशा

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर वाढविण्यासोबतच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क वाढवले. या शुल्कात २ रुपये लिटर इतकी वाढ केली. या निर्णयामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार नाहीत. पेट्रोल, डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादक शुल्काचा उद्देश हा ग्राहकांवर ओझे टाकण्याचा नाही. उलट तेल विपणन कंपन्यांना झालेल्या ४३,००० कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यास मदत करणे आहे, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री पुरी यांनी सांगितले. केंद्र सरकार पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर १० रुपये वसूल करीत आहे. 
कच्च्या तेलाच्या किमती 
घसरूनही शुल्क वाढविले
गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली. जवळजवळ ६० डॉलर प्रति बॅरलपर्यंत किंमती घसरल्या आहेत. मागच्या काही दिवसांत खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याने तेल कंपन्यांचा नफा वाढला. अशावेळी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी उत्पादन शुल्कात वाढ करून सरकारची तिजोरी भरण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे सामान्यांची निराशा झाली. भारत जगातील तिसरा मोठा तेल आयातदार देश आहे. भारत आपल्या गरजेच्या ८७ टक्के तेल आयात करतो. 
इंधनावर अवाजवी 
कर लावून जनतेची लूट
 जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६० डॉलर प्रतिबॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहेत. भाजप सरकार इंधनावर अवाजवी आणि अन्यायकारक झिजिया कर आकारून जनतेची लूट करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.