नुकसानीचे फोटो समोर, पाकची पोल खोलली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर एअर स्ट्राईक करून ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतरही पाकिस्तानने सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केला. एवढेच नव्हे तर थेट भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे निकामी ठरवली आणि त्यांचे हल्ले उधळून लावले. त्यानंतर भारताने १० मे रोजी सकाळी पाकिस्तानच्या एअरबेसवर जोरदार हल्ला चढवला. यात पाकचे एअरबेस उद्ध्वस्त झाले. त्यावर आता पहिल्यांदाच सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. यावरून नुकसानीचाही अंदाज येतो.
भारताने १० मे रोजी अचूक हवाई हल्ले करून पाकिस्तानच्या हवाई दलाच्या प्रमुख एअरबेसवर हल्ला चढवून मोठे नुकसान केले. भारताची खासगी सॅटेलाईट फर्म कावास-पेस आणि चिनी फर्म मिझा व्हिजनने सॅटेलाईट फोटो जारी केले. या दोन्ही सॅटेलाईट फर्मच्या उच्च रिझॉल्यूशन सॅटेलाईट इमेजरीने हल्ल्याचा प्रभाव किती मोठा होता, याची पुष्टी केली. या हल्ल्यात भारताने एअर लॉन्चड क्रूझ मिसाईलचा वापर केला. तसेच ब्रम्होसचाही वापर केला.
भोलारी एअरबेस पूर्ण बेचिराख झाले. पीएएफचे भोलारी एअरबेस भारताच्या सर्वात घातक हल्ल्याचा निशाणा बनले. एअरबेसचे एक प्रमुख हँगर पूर्णपणे नष्ट झाले. जैकोबाबाद एअरबेस शाहबाजवरही भारतीय मिसाईलने अचूक हल्ला केला. याशिवाय सरगोधा एअरबेस रनवेचे नुकसान झाले. यात रनवे आणि आसपासच्या संरचनेचे थोडे नुकसान झाले. नूर खान एअरबेस ग्राऊंड इंफ्रास्ट्रक्चरवर निशाणा साधला. या हल्ल्यानंतर संरक्षण विश्लेषकांनी सांगितलं की, दहशतवादाविरोधातील कारवाई आता राजकीय स्तरावर नाही तर सैन्य शक्तीच्या रुपाने होणार असल्याचे भारताने पाकिस्तानला दाखवून दिले.