पुणे : प्रतिनिधी
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी पहाटे झोपेतच निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. खगोल शास्त्रातील तारा निखळला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात डॉ. नारळीकर यांनी अमूल्य योगदान दिले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. विज्ञानातील अनेक बदल आणि नवे शोध त्यांनी जगापुढे मांडले. मुलांमध्ये विज्ञान रुजावे, यासाठी त्यांची खास तळमळ होती. विज्ञान सुलभ भाषेतून शिकवण्यासाठी ते साहित्याच्या पंढरीत रमले. साहित्य लेखनातून त्यांनी विज्ञान साहित्यविश्वाचे नवे दालनच उघडले नाही तर ते समृद्ध केले.
. विज्ञान साहित्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. १९७९ मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांचा यक्षांची देणगी हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याने विज्ञान साहित्याच्या चौकटी बदलल्या. हॉयल-नारळीकर सिद्धांतामुळे त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले. विज्ञान कथा लिहिताना त्यांनी बोजड, कंटाळवाणे वळण टाळले.
केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर जयंत नारळीकर भारतात परतले. आधी त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ. नारळीकर यांना घरातूनच त्यांना विज्ञानाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ होते तर आई सुमती या संस्कृत विदुषी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले होते. तेथूनच त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली होती.
जीवन परिचय
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली.
नारळीकर यांची साहित्य संपदा
अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस ही पुस्तके त्यांनी लिहिली. तसेच विज्ञानविषयक पुस्तकांमध्ये अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमती-जमती, नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप याचा समावश आहे. तसेच चार नगरांतले माझे विश्व हे आत्मचरित्र आहे.
मिळालेले पुरस्कार
-१९६५ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरव
-२००४ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार
-२०१० मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार
- भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला पुरस्कार
-२०१४ मध्ये डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३
-‘चार नगरांतले माझे विश्व’या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार (२०१४) मिळाला आहे.
-यक्षांची देणगी’ पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
-अमेरिकेतील फाऊंडेशनचा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
-फाय फाऊंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार
-अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपद (नाशिक २०२१)