आरसीबीने पटकावले आयपीएलचे जेतेपद

yongistan
By - YNG ONLINE
१७ वर्षांचा दुष्काळ संपविला, विराटला अश्रू अनावर 
अहमदाबाद : वृत्तसंस्था
आयपीएलच्या १८ व्या हंगामातील अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शानदार प्रदर्शन करीत पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावत इतिहास रचला. दमदार फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांचा खुबीने वापर केल्याने बंगळुरूला विजय साकारता आला आणि अखेर विराट कोहलीचे स्वप्न साकार झाले. विजय टप्प्यात येताच शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी विराट कोहली स्टेडियमच्या मध्यभागी रडताना दिसला. त्याच्या डोळ््यात आनंदाश्रू होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकल्यानंतर विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्सला मिठी मारली. यानंतर अनुष्काला मिठी मारल्यानंतर विराट रडला.
आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या ४३ धावांच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ९ गडी गमावून १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबला निर्धारित षटकांत ७ गडी गमावून १८४ धावा करता आल्या. यासह आरसीबीने ६ धावांनी सामना जिंकला आणि आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले.

जेतेपद जिंकल्यानंतर आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली भावूक झाला. त्याच्या डोळ््यात विजयाचे अश्रू होते. विजयानंतर कोहलीने प्रथम आपल्या सहका-यांना मिठी मारली आणि विजय साजरा केला. त्यानंतर कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्माला भेटून विजयाबद्दल तिचे अभिनंदन केले. यादरम्यान या महान फलंदाजाने त्याचा माजी संघमित्र आणि खास मित्र एबी डिव्हिलियर्स याचेही अभिनंदन केले.  

आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात आरसीबीला जेतेपदाने ३ वेळा हुलकावणी दिली. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आरसीबी अंतिम फेरीत पोहोचला. परंतु प्रत्येक वेळी जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. २०२५ मध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाचे नशीब बदलले आणि त्यांनी पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. दुसरीकडे श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या नेतृत्वाखाली ११ वर्षांनी पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या पंजाब किंग्जची जेतेपदाची प्रतीक्षा कायम राहिली. 

विराटच्या अश्रूंचा फुटला बांध
आयपीएलच्या १८ व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपद मिळाले. शेवटच्या षटकात पंजाब किंग्सला विजयासाठी २९ धावांची गरज होती. शेवटचे षटक टाकण्यासाठी जोश हेझलवूड आला होता. त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यावेळी विराटला विजयाचा विश्वास वाटला. त्यावेळी सीमेवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डोळ््यातून अश्रू आपसूक बाहेर निघाले. गेली १७ वर्षे ज्याची वाट पाहात होता, ते स्वप्न पूर्ण होताना पाहून त्याला अश्रू आवरता आले नाहीत. तो मैदानात अक्षरश: ओक्साबोक्सी रडला.