इस्रायल-इराणमध्ये युद्ध पेटले

yongistan
By - YNG ONLINE
हल्ले-प्रतिहल्ले सुरू, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्राचा मारा, मोठी हानी
जेरूसलेम : वृत्तसंस्था 
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांत आता युद्ध पेटले आहे. दोन्ही देशांनी क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा सुरू केला. यात अभूतपूर्व हानी झाली असून, या संघर्षामुळे जग चिंतेत पडले आहे. शुक्रवार, दि. १३ जून २०२५ रोजी पहाटे इस्रायलने ऑपरेशन राजझिंग लायनच्या माध्यमातून इराणमध्ये एअर स्ट्राईक केला. जवळपास ६ शहरांत क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यानंतर इराणनेही तोडीस तोड उत्तर दिल्याने इस्रायलमध्येही तेल अवीवसह इतर शहरांत मोठी हानी झाली. आधीच गाझा, लेबनॉन, सीरिया आणि येमेनमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यात इस्रायल-इराण यांच्यात युद्ध पेटल्याने संघर्षाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

सर्वप्रथम इस्रायलने इराणविरुद्ध ऑपरेशन राजझिंग लायन सुरू करून क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात मारा केला. विशेषत: इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करून हे हल्ले चढविले. त्यामुळे इराणचे आघाडीचे शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिका-यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खवळलेल्या इराणनेही इस्रायलवर हल्ले चढविले. इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील प्रमुख शहर तेल अवीवमध्ये प्रचंड नुकसान झाले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. काही घरे तर पूर्णत: जमीनदोस्त झाली. इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला. तेल अवीवमधील दक्षिणेतील रिशोन लिजियन येथे प्रचंड हानी झाली. 

इस्रायलने शुक्रवारी दिवसभरात इराणवर तिस-यांदा हल्ला चढवला. पहाटे शेकडो लढाऊ विमाने इराणमध्ये घुसली आणि तेथील अण्वस्त्र कार्यक्रमावर हल्ले चढविले. इराणची राजधानी तेहरानसह सहा शहरांत एअर स्ट्राईक घडवून आणला. यात इराणचे महत्त्वाचे अण्वस्त्र शास्त्रज्ञ ठार झाले. तसेच अण्वस्त्र कार्यक्रमाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देश सोडल्याचे वृत्त आहे. 

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने शुक्रवारी रात्री इस्रायलमधील तेल अवीव आणि जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांमध्ये हवाई हल्ला केला. इराणकडून मोठ्या प्रमाणात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यातील बहुतांश थांबविण्यात आल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. मात्र, मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा झाल्याने तेल अवीवमध्ये घरे उद्ध्वस्त झाली. तसेच मनुष्यहानीही झाली. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, इराणने इस्रायलच्या नागरी लोकसंख्येच्या केंद्रांवर क्षेपणास्त्रे डागून लाल रेषा ओलांडली आहे. इस्रायल त्याला चोख प्रत्युत्तर देईल. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर युद्ध सुरू केल्याचा आरोप केला.