भीषण दुर्घटना, अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृत्यू
अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवार, दि. १२ जून २०२५ रोजी दुपारी दीडच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथून लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या विमानाने ७ मिनिटांत ६६५ फुटांवरून मेघानीनगर या निवासी परिसरातील बी. जे. वैद्यकीय कॉलेजच्या इमारतीला धडक देऊन तेथे कोसळले. त्यानंतर स्फोट होऊन आगीत विमानासह इमारत, परिसर खाक झाला. एअर इंडियाच्या बोईंग ड्रिमलायनर ७८७ या विमानातून २ वैमानिक १० क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी प्रवास करीत होते. यात २४१ प्रवासी आणि वैद्यकीय कॉलेजचे तब्बल २४ विद्यार्थी असे एकूण २६५ मृत्युमुखी पडले. विमान वैद्यकीय कॉलेजच्या इमारतीवर आदळल्याने कँटिनमध्ये जेवण करणा-या २४ भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरून उठविले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी लंडनसाठी उड्डाण घेतले. त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत तब्बल ६६५ फुटांवरून हे विमान मेघानीनगर या निवासी भागात एका इमारतीला धडकून कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे या विमानाला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात विमानाच एक पंख तुटला आणि विमानापासून वेगळा झाला. अपघात होताच भीषण स्फोट होऊन आग भडकली. विमानात इंधनसाठा प्रचंड असल्याने आगीचा मोठा भडका उडाला. आकाशात आगीचे लोळ पसरले. मेघानीनगर या दाट लोकवस्तीच्या भागातील वैद्यकीय कॉलेजच्या इमारतीला हे विमान धडकले. त्यामुळे इमारतीच्या भिंती कोसळल्या आणि भडकलेल्या आगीत इमारत, संपूर्ण परिसर आणि स्फोटामुळे आजूबाजूंची वाहनेही खाक झाली.
अपघातानंतर अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. एनडीआरएफच्या विविध पथकांसह आपत्कालीन यंत्रणा अपघातस्थळी पोहोचल्या आणि मदत व बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त बोईंग ड्रिमलायनर ७८७ विमान हे ११ वर्षे जुने आहे. अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले. विमानाचा बहुतांश भाग जळून भस्मसात झाला.
२४१ प्रवाशांचा मृत्यू
विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४२ प्रवासी प्रवास करीत होते. या भीषण दुर्घटनेत रूपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते लंडनमधील आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. त्यांच्यासह २४१ प्रवासी आणि २४ मेडिकलचे विद्यार्थी अशा एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला.
विमानात होते एकूण
१६९ भारतीय प्रवासी
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात एकूण २४२ प्रवासी होते. यात २ पायलट आणि १० केबिन क्रूचा समावेश होता. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते, अशी माहिती एअर इंडियाने दिली. या प्रवाशांमध्ये ११ लहान मुले आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता. या दुर्घटनेमुळे संपूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला आहे. भारतातील पहिलाच सर्वांत मोठी विमान दुर्घटना असल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले.
राज्यातील ११ बळी
विमान अपघातात एअर इंडिया विमानाचे २ को-पायलट, ३ महिला क्रू मेंबर्स, एक पुरुष क्रू मेंबर्स, सांगोला तालुक्यातील दोघे आणि नागपूर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला. हे सर्व जण महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. त्यामुळे अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील ११ जणांचा बळी गेला. यामध्ये विमानाचे को-पायलट दीपक पाठक, बदलापूर आणि सुमित सबरवाल तसेच १० क्रू मेंबर्सपैकी अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, मयूर पाटील यांचा मृत्यू झाला. यासोबतच सांगोला तालुक्यातील हातीद येथील मूळ रहिवासी महादेव तुकाराम पवार (६७) आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार (५५), नागपूर येथील मनीष कामदार यांची मुलगी, सासू आणि नात यांचा मृतांमध्ये समावेश असून, कुशयशा कामदार, रुद्र मोढा, रक्षा मोढा अशी त्यांची नावे आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना
टाटाकडून प्रत्येकी १ कोटी
एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा ग्रुपने याबद्दल दु:ख व्यक्त करताना नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींचा वैद्यकीय खर्चही केला जाणार असून, आवश्यक ती सर्व काळजी घेताना जखमींना मदतही मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे.