विधानसभा पोटनिवडणुकीत आप ला २ जागा

yongistan
By - YNG ONLINE
केरळात कॉंग्रेस विजयी, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, भाजपलाही एकच जागा
जाहीर
 नवी दिल्ली : २०२६ साली होणा-या पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठरलेल्या पाच विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने मोठी बाजी मारली. भाजपने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले असतानाही त्यांना केवळ गुजरातमधील कडी या सुरक्षित जागेवर विजय मिळवता आला. इतर ठिकाणी त्यांचा पराभव झाला. केरळच्या निलांबरमधून कॉंग्रेसने विजय मिळविला.
 पंजाबमधील लुधियाना वेस्ट विधानसभा मतदारसंघात आपचे संजीव अरोरा यांनी १०००० हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. ही जागा आपचे आमदार गुरप्रीत गोगी यांच्या आत्महत्येमुळे रिकामी झाली होती. काँग्रेसचे भारत भूषण आशू दुस-या स्थानी तर भाजपचे जीवन गुप्ता तिस-या क्रमांकावर होते.
 गुजरातमधील विसावदरमध्ये आपचे माजी राज्याध्यक्ष गोपाल इटालिया यांनी भाजपच्या किरीट पटेल यांचा १७००० पेक्षा अधिक मतांनी पराभव केला. ही जागा याआधी आपकडे होती, मात्र भूपेंद्र भायाणी यांच्या भाजप प्रवेशामुळे रिकामी झाली होती. गुजरातमधील कडी मतदारसंघात भाजपचे राजेंद्र चावडा यांनी ३९००० हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. फेब्रुवारीत आमदार कर्सन सोलंकी यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली होती. काँग्रेसकडून रमेश चावडा आणि आपकडून जगदीश चावडा हे उमेदवार होते.
पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील कालीगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या अलीफा अहमद यांनी ५०००० हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. ही जागा त्यांच्या वडिलांचे, माजी आमदार नसीरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे रिकामी झाली होती. 
केरळात काँग्रेसचा विजय
निलांबूरमध्ये काँग्रेस आघाडीने आपला मजबूत गड राखला. आर्याडन शोकत यांनी डाव्या आघाडीचे एम. स्वराज यांचा ११००० मतांनी पराभव केला. शोकत हे माजी मंत्री आर्याडन मोहम्मद यांचे पुत्र असून त्यांचा मोठा जनाधार आहे.