सीरिया, कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला
तेहरान : वृत्तसंस्था
इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतली आणि इराणमधील ३ अण्वस्त्र तळांवर एअर स्ट्राईक केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या इराणने या हल्ल्याचा बदला घ्यायला सुरुवात केली असून, सीरियातील पश्चिम हसाका आणि कतारमधील दोहा येथील अल उदेद या अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या सैन्य तळांवर क्षेपणास्त्र डागले. इराणमधील अमेरिकेच्या हल्ल्याला ३६ तास उलटल्यानंतर पलटवार करीत इराणने अमेरिकन तळांवर हल्ला केला. त्यामुळे युद्ध भडकण्याची शक्यता आहे.
इराणने अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू करताच हल्ल्याच्या भीतीने कतार, बहरीन, यूएई, कुवैत आदी देशांनी तातडीने हवाई क्षेत्र बंद केले. त्यामुळे मध्य-पूर्व आशियात तणाव वाढला आहे. गेल्या आठवड्याभरापासून इराण-इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले चढवत आहेत. अमेरिकेने युद्ध थांबविण्यासाठी इराणवर दबाव आणला. परंतु युद्ध सुरूच राहिले. त्यातच रविवारी २२ जून रोजी अमेरिकेने थेट इराणच्या ३ आण्विक तळांवर हल्ला करून तिन्ही तळ उद्ध्वस्त करीत इराणला मोठा धक्का दिला. अमेरिका इस्रायलच्या बाजूने युद्धात उतरला. ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर द्यायला सुरुवात केली.
इराणने सीरियाच्या पश्चिम हसाका प्रांतात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केल्याची माहिती आहे. परंतु या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारली नाही. दरम्यान, कतारमधील दोहा येथील अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या लष्करी तळावर इराणने ६ क्षेपणास्त्र डागले. या लष्करी तळाचे नाव अल उदेद असे आहे. या लष्करी तळावर जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
अमेरिकेने युद्धात उडी घेतल्यास मध्य-पूर्व आशियातील त्यांच्या सैनिकी तळांवर हल्ले करू, अशी थेट धमकी इराणने दिली होती. त्यातच आता अमेरिकेने जेवढी क्षेपणास्त्रे इराणच्या अणुप्रकल्पांवर डागली, तेवढीच क्षेपणास्त्रे इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर डागली आणि त्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला, असे इराणने म्हटले आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली. आता या हल्ल्यानंतर अमेरिका काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.
इराणचे ऑपरेशन
बशारत फतह
इराण आणि अमेरिकेत आता थेट संघर्ष सुरू झाला असून, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आज इराणने थेट प्रत्युत्तर देत कतारमधील दोहा येथील अल-उदेद लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागले. अमेरिकेविरुद्ध ऑपरेशन बशारत फतह अभियान अंतर्गत हा हल्ला केला असून, आण्विक केंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतल्याचे इराणने म्हटले आहे.
कतार, यूएई, कुवैतचे हवाई क्षेत्र बंद
कतारने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला असून सर्व उड्डाणांवर बंदी घातली आहे. नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराण कधीही प्रत्युत्तर देऊ शकतो. याचा विचार करून कतारने हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर यूएई, बहरिन, कुवैतनेही आपले हवाई क्षेत्र बंद केले असून, विमान उड्डाणेही बंद केली.
कतारमध्ये अमेरिकन लष्कराचे मुख्यालय
अल उदीद हे कतारच्या दोहा या राजधानीपासून अवघ्या २० मैल दक्षिणेला आहे. अल उदीद हे अमेरिकेचे पश्चिम आशियातील सर्वात मोठे हवाई तळ आहे. या ठिकाणी सुमारे आठ ते दहा हजार अमेरिकन सैन्य आहे. त्याचप्रमाणे अल उदीद हे पश्चिम आशियातील सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडचे मुख्यालय आहे. संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे सुमारे ४० हजार सैन्य तैनात आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेच्या सर्व लष्करी तळांवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आता सीरिया, कतार, इराक आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केला आहे.