तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या संसदेने आंतरराष्ट्रीय कॉरिडॉर होर्मुझ कॉरिडॉर अर्थात होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी घेणार आहेत. या निर्णयाचा परिणाम जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. यामुळे जगभरात क्रूड ऑईलच्या किमती वाढतील. यासह इतर वस्तूदेखील महाग होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पर्शियन समुद्र आणि गल्फ ऑफ ओमानदरम्यान कार्गो जहाजांसाठी हॉर्मुझ हा छोटा सागरी मार्ग आहे. जगभरातील २० टक्के तेल आणि गॅसचा व्यापार या मार्गाने होतो. जर हा मार्ग बंद झाला तर कार्गो जहाजांना त्यांचा मार्ग बदलून प्रवास करावा लागेल. वाहतुकीच्या खर्चात वाढ होईल. नव्या मार्गाने जायचे असल्याने अधिक वेळ देखील लागू शकतो. इराणच्या या निर्णयाचा परिणाम जगभरातील विविध देशांवर होऊ शकतो, याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेवरदेखील होण्याची शक्यता आहे.
या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र, हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला फटका बसू शकतो. भारताच्या पश्चिम आशियातील देशांसोबतच्या व्यापारावरही परिणाम होणार आहे. यामध्ये इराणसह इराक, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि येमेन या देशांचा समावेश आहे. या देशांत भारताची एकूण निर्यात ८.६ अब्ज डॉलर आणि आयात ३३.१ अब्ज डॉलर आहे. भारताने २०२४-२५ या आर्थिक वर्षात इराणला एकूण १.२४ अब्ज डॉलर्सची निर्यात केली, ज्यामध्ये बासमती तांदूळ (७५३.२ दशलक्ष डॉलर), केळी, सोयाबीन पेंड, हरभरा आणि चहा यासारख्या कृषी उत्पादनांचा समावेश होता. तसेच भारताने इराणमधून ४४१.८ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या. तसेच भारताने इस्रायलसोबत २.१ अब्ज डॉलर्सची निर्यात आणि १.६ अब्ज डॉलर्सची आयात केली. सध्या हे दोन्ही देश संकटात आहेत. त्यामुळे भारताला फटका बसू शकतो.
कच्चे तेल १८ टक्क्यांनी महागले
इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे एका आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत तब्बल १८ टक्क्यांनी वाढली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत आता ७५ डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास पोहोचली आहे. भारताला लागणारे ५० टक्के तेल आणि नैसर्गिक वायू होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. भारत ४० टक्के एलएनजी कतारमधून आणि १० टक्के इतर आखाती देशांमधून आयात करतो. तसेच २१ टक्के तेलाची आयात इराक आणि उर्वरित इतर आखाती देशांमधून करतो. त्यामुळे इराणने हा मार्ग बंद केल्यास तेलाच्या किमती वाढू शकतात.
निर्यातीचा खर्च वाढणार
भारतातून आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होणारा मालदेखील लांबच्या मार्गाने निर्यात करावा लागेल, त्यामुळे निर्यातीचा खर्च वाढेल. याचा एकंदरीत फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी काय आहे?
होर्मुझ सामुद्रधुनी ही पर्शियन खाडीला अरबी समुद्राशी जोडते. हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि रस्ता आहे. जगभरात पुरवठा केले जाणारे तेल आणि एलएनजी याचा जवळपास ३० टक्के हिस्सा याच मार्गावरून जातो. जर हा रस्ता बंद झाला तर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि किमतीदेखील वाढतील.