दिग्दर्शक जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू पुरस्कार

yongistan
By - YNG ONLINE
कोल्हापूर : प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेल्या कार्यातून आपला स्वतंत्र ठसा उमटवणा-या मान्यवरांना दरवर्षी राजर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. यंदा २०२५ चा राजर्षी शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रांत दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणा-या पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे. जब्बार पटेल हे या पुरस्काराचे ३९ वे मानकरी ठरले आहेत.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टमार्फत गेली ३८ वर्षे राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असणा-या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीदिनी समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान करणा-या व्यक्तीस १९८४ पासून राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा जब्बार पटेल यांना हा पुरस्कार जाहीर झाला. 
जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही घोषणा केली. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपपोलीस अधीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. जब्बार पटेल  
प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा जन्म २३ जून १९४२ रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये झाले व इथेच त्यांना नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्यांनी सन १९६८ साली पुण्याच्या बी. जे. मेडीकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पदवी मिळवली व त्यानंतर १९७० साली मुंबईहून चाईल्ड हेल्थ पदविका प्राप्त केली. सन १९७१ मध्ये त्यांनी दौंड जि. पुणे येथे आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञ पत्नीबरोबर वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. त्यांचे चित्रपट सृष्टीत महत्त्वाचे योगदान आहे.