भारतीय अंतराळवीर शुक्ला यांची अंतराळ झेप एक दिवस लांबणीवर

yongistan
By - YNG ONLINE

- खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
- इस्रोने दिली माहिती
 बंगळुरू : वृत्तसंस्था
खराब हवामानामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी ऍक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले. १० जून रोजी सायंकाळी हे यान घेऊन रॉकेट अंतराळ स्टेशनकडे झेपावणार होते. परंतू, आता ते ११ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता झेपावणार आहे, असे इस्रोने कळविले आहे. 
 इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी ही माहिती दिली. भारतीय हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह अन्य तिघेजण हे ऍक्सिओम-४ या अंतराळ मोहिमेत सहभागी होणार आहेत. ऍक्सिओम-४ मोहिमेतील क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जातील, जिथे ते प्रयोगशाळेत फिरतील आणि विज्ञान, पोहोच आणि व्यावसायिक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणा-या मोहिमा पार पाडतील. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या एलसी-३९ ए लाँच पॅडवरून स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानाद्वारे हे सर्वजण अंतराळात जाणार होते. परंतु खराब हवामानामुळे लाँचिंग टाळण्यात आले आहे. 

पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारतीय अंतराळवीर पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. भारताकडून शुक्ला यांना संधी मिळाली आहे. त्यांच्यासोबत मिशन कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी), पोलंडचे स्लाव्होस वुज्नान्स्की-विस्रिव्स्की (मिशन स्पेशालिस्ट) हे असणार आहेत. 
 हे अंतराळवीर तिथे ६० प्रयोग करणार आहेत. पैकी ७ प्रयोग हे इस्रोचे आहेत. हे अभियान १४ दिवसांचे असणार आहे. शुक्ला हे भारतीय हवाई दलातील पायलट आहेत आणि त्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ऐतिहासिक गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांपैकी एक म्हणून निवडण्यात आले आहे. गगनयान हे भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण असणार आहे. शुक्ला यांना या अनुभवाचा गगनयान मोहिमेवेळी फायदा होणार आहे.