पहिल्यांदाच जिंकला खिताब, अल्काराझची हॅट्टिट्रक हुकली
लंडन : वृत्तसंस्था
विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रविवार, दि. १३ जुलै रोजी अग्रमानांकित यानिक सिनर याने इतिहास रचत दोनवेळच्या चॅम्पियन कार्लोस अल्कराझला पराभूत केले आणि इटालियन टेनिस स्टारने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा जिंकली.
या आधी पाचवेळा अल्कराझ आणि सिनर यांच्यात सामना झाला. ज्यात अल्काराझ भारी ठरला. पण विम्बल्डनच्या फायनलमध्ये पहिला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक करीत इटालियन खेळाडू सिनरने विम्बल्डन स्पर्धेत नवा इतिहास रचला. त्याने दोन वेळा विजेत्या कार्लोस अल्काराझला ४-६, ६-४, ६-४, ६-४ अशा निकालाने पराभूत करून पहिल्यांदाच विम्बल्डनचा खिताब जिंकला.
२३ वर्षांच्या सिनरने १९६८ पासून सेंटर कोर्टवर ट्रॉफी उंचावणारा २३ वा खेळाडू होण्याचा मान मिळविला. यापूर्वी फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यातही अल्काराझने सिनरला ५ तास २९ मिनिटांच्या थरारक सामन्यात हरवले होते. अल्काराझचे सलग तिस-यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर रंगलेल्या या अंतिम सामन्यातील लढत जिंकत यानिक सिनर याने चौथ्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरले. विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात १७ लढतीत टेनिस जगतातील नंबर वन आणि दुस-या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंमध्ये फायनलचा थरार रंगला. ११ वी वेळ अग्रमानांकित टेनिस स्टारने फायनल बाजी मारल्याचे पाहायला मिळाले.
२०२४ मध्ये पहिले ग्रँडस्लॅम जिंकले
२३ वर्षीय इटालियन खेळाडू यानिक सिनर याने २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत डॅनियल मेदवेदेव याला पराभूत करीत पहिली ग्रँडस्लॅम जिंकली होती. याच वर्षी त्याने अमेरिकन ओपन स्पर्धेत टेलर फ्रिट्सला पराभूत करीत दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवली. यंदाच्या वर्षी सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जेतेपदासह वर्षाची दमदार सुरुवात केली होती. २०२५ च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिरन यांच्यात जेतेपदासाठी लढत झाली. यात सिनर विम्बल्डनचा नवा राजा ठरला.