दुबई : वृत्तसंस्था
यूएईत वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठी आहे. विशेषत: दुबईला या समस्येचा मोठा सामना करावा लागतो. याचा विचार करून तेथे एअर टॅक्सीचा प्रयोग करण्यात आला होता. आता तो प्रयोग यशस्वी झाला आहे. आता पुढील वर्षापासून दुबईत ही एअर टॅक्सी सेवा नियमित सुरू होणार आहे.
दुबईत जसा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तशीच समस्या भारतात प्रत्येक शहरात भेडसावत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे याचा नेहमीच सामना करावा लागतो. मुंबई, पुण्यात याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे वाहतुकीचे पर्यायी मार्गाचा अवलंब केला जातो. तरीही ही समस्या दिवसेंदिवस अधिक भेडसावत आहे. यावर चांगला उपाय म्हणून दुबई तर एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
यामुळे एक तर कमी वेळेत सुखकर प्रवास होणार आहे. एवढेच नव्हे, तर वाहतूक कोंडीपासूनही मुक्ती मिळणार आहे. विना अडथळ््याचा हा प्रवास होऊ शकतो.
दुबई रस्ते-वाहतूक प्राधिकरण आणि जॉबी एव्हिएशन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच एअर टॅक्सीची ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. शहरी भागातील दळणवळण आणखी सोईचे आणि वेगवान होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ही एअर टॅक्सी संपूर्णपणे इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूर्कही आहे. त्यामुळे यूएईत राबवण्यात आलेला हा प्रयोग जागतिक पातळीवर प्रगत तंत्रज्ञानाचा अनोखा आविष्कार मानला जात आहे. या यशस्वी प्रयोगानंतर दुबईचे प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांनी सोशल मीडिया पोस्ट करत २०२६ मध्ये हवाई टॅक्सी सेवा नियमितपणे सुरू करण्याच्या व्यापक तयारीचा हा एक भाग असल्याचे म्हटले.
भारतातही होणार प्रयोग?
काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने मुंबई, पुणे आणि दिल्लीत लवकरच एअर टॅक्सी सुरू करणार अशी घोषणा केली होती. असे झाले तर शहरांतर्गत असणारी ही हवाई सेवा वाहतूक कोंडीवर किमान काही प्रमाणात तरी दिलासा देणारी ठरु शकते.