भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण

yongistan
By - YNG ONLINE
मुंबई : प्रतिनिधी 
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड झालेली आहे. त्यांच्या नावाची घोषणा पक्षाकडून करण्यात आलेली आहे. चव्हाण यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हापासूनच त्यांच्याकडे संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी अटकळ होती. पक्षाने आधी त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद दिले. त्यानंतर आज त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
रविंद्र चव्हाण डोंबिवलीचे चार टर्मचे आमदार आहेत. डोंबिवली त्यांची कर्मभूमी आहे. त्यांचं ठाणे जिल्ह्यावर चांगलं वर्चस्व आहे. संघटनेवर उत्तम पकड आहे. चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवून भाजपनं सत्तेत वाटेकरी असलेल्या एकनाथ शिंदे यांना स्पष्ट संदेश दिलेला आहे. २०२९ मध्ये भाजप स्वबळावर सत्तेत असेल, असं अमित शहांनी गेल्याच वर्षी जाहीरपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे मिशन शतप्रतिशतची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे असेल. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला शह देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागेल.
  महापालिका, नगर पंचायतींचा जिल्हा अशी ठाण्याची ओळख आहे. ठाणे महापालिकेची सत्ता एकनाथ शिंदे यांनी अनेक वर्षांपासून आपल्याकडे राखली आहे. ठाण्यासोबतच नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निझामपूर, मिरा-भाईंदर, उल्हासनगर या महापालिका जिल्ह्यात येतात. त्यासोबतच अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, मुरबाड आणि शहापूर नगरपालिका, नगर पंचायतीदेखील जिल्ह्यात मोडतात. या सगळ््या महापालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण करण्याची कामगिरी चव्हाण यांना पार पाडावी लागेल.