हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेची भारतात चाचणी यशस्वी

yongistan
By - YNG ONLINE
चेन्नई : वृत्तसंस्था
चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत हायड्रोजनवर चालणा-या देशातील पहिल्या रेल्वेची चाचणी आज यशस्वी ठरली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशवासीयांसाठी ही मोठी बातमी दिली. या यशस्वी चाचणीमुळे हायड्रोजनवर रेल्वे धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे रेल्वे सेवेत क्रांतीकारक बदल होणार आहे. 
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी या पोस्टमध्ये टेस्टचा व्हिडीओही शेअर केला. हायड्रोजनवर चालणा-या पहिल्या कोच (ड्रायव्हिंग पॉवर कार) च्या आयसीएफची चेन्नईत यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. भारत १२०० एचपी हायड्रोजन रेल्वे विकसित करत आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. ज्या कोचची चाचणी करण्यात आली, त्याला ड्रायव्हिंग पॉवर कारच्या नावाने ओळखले जाते. हरित ऊर्जा आणि भविष्यातील परिवहन सेवेसाठीचे नवे पर्याय निर्माण करण्यासाठी भारत नेहमीच वचनबद्ध राहिला आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
डिझेल आणि विजेवर चालणा-या ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजनवर चालणारी रेल्वे ही पर्यावरणपूरक आहे. या ट्रेनमधून धूर निघत नाही आणि कार्बन डायऑक्साईडही सोडला जात नाही. त्यामुळे प्रदूषणाला आळा बसतो. ही रेल्वे हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानावर काम करते. यात हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेतून एनर्जी निर्माण होते.
२०२३ मध्येच अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत याची माहिती दिली होती. भारतीय रेल्वे हायड्रोजनचा वापर करणार आहे. या मोहिमेअंतर्गत ३५ हायड्रोजन ट्रेन चालवण्याची आम्ही योजना आखत आहोत. प्रत्येक ट्रेनसाठी अंदाजे ८० कोटी रुपये खर्च होणार आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली होती. आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण यशस्वी चाचणीमुळे आता हायड्रोजनवर चालणा-या रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. 
उत्तर रेल्वेच्या जिंद-सोनीपत खंडावर चालणारी एक डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल यूनिटला हायड्रोजन इंधन कोशिकांसोबत पुनर्निर्मित करण्यासाठी १११.८३ कोटीची एक पायलट योजनाही सुरू करण्यात आली. सुरुवातीला हायड्रोजनवर चालणा-या रेल्वेसाठीचा खर्च अधिक होऊ शकतो. पण काळानुसार खर्चात कपात होण्याची शक्यता आहे.