लष्करप्रमुखांची घोषणा, सीमेवर भैरव लाईट कमांडो सज्ज
द्रास : वृत्तसंस्था
२६ व्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराच्या आधुनिकीरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत भारतीय सैन्याच्या दोन इन्फन्ट्री ब्रिगेडचे रुद्र ब्रिगेडमध्ये रुपांतर केले. यासोबतच एक नवीन भैरव लाईट कमांडो बटालियनही तयार केली असल्याची घोषणा केली. भविष्यात भारताची रुद्र ब्रिगेड शत्रूंसाठी धोकादायक ठरेल, असे जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले. द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
भारतीय लष्करात रुद्र ब्रिगेडची स्थापना केली जात आहे. मी कालच याला मंजुरी दिली. या अंतर्गत आपल्याकडे एकाच ठिकाणी इन्फन्ट्री, मेकॅनिकल इन्फन्ट्री, आर्मर्ड युनिटस, तोफखाना, विशेष दल आणि मानवरहित एरियल युनिटस् असतील, जे रसद पुरवतील. लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणाली स्वदेशी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होत असल्याने येत्या काळात सैन्याची क्षमता अनेक पटींनी वाढेल, असेही जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.
यासोबतच भैरव लाईट कमांडो ही विशेष सेना तयार केली आहे. ही तुकडी सीमेवर शत्रूला आश्चर्यचकित करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. प्रत्येक इन्फन्ट्री बटालियनमध्ये आता एक ड्रोन प्लाटून आहे. तोफखान्यात शक्तीबान रेजिमेंट तयार करण्यात आली आहे, जी ड्रोन, ड्रोनविरोधी उपकरणे आणि आत्मघाती ड्रोनने सुसज्ज असेल. विकसित भारत २०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. विकासकामात सैन्यदेखील योगदान देत आहे. या अंतर्गत लडाखसारख्या सीमावर्ती भागात विकासकामे केली जात आहेत, असेही जनरल द्विवेदी म्हणाले. २६ व्या कारगिल दिनानिमित्त लष्करप्रमुखांनी एक पोर्टलसह तीन प्रकल्प सुरू केले. या पोर्टलद्वारे शहिदांना ई-श्रद्धांजली वाहता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विविध लढाऊ दलाचा
आता एकत्रित समावेश
रुद्र ब्रिगेडची रचना पारंपरिक ब्रिगेडपेक्षा वेगळी आहे. आतापर्यंत लष्करात विशिष्ट दलांच्या ब्रिगेड होत्या. आता रुद्र ब्रिगेडमध्ये विविध लढाऊ दलांचा एकत्रित समावेश असणार आहे. यामध्ये पायदळ, मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री, चिलखती दल, तोफखाना, विशेष दल, मानवरहित हवाई प्रणाली (ड्रोन) याचा समावेश असणार आहे. या सर्व दलांना आवश्यक लॉजिस्टिक्स आणि लढाऊ सहाय्य पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे युद्धभूमीवर अधिक वेगाने आणि समन्वयाने कारवाई करणे शक्य होणार आहे.
आधुनिकीकरणाच्या
दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीनेही पावले टाकली जात असून, लष्कराच्या हवाई संरक्षण दलाला स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालींनी सुसज्ज केले जात आहे. तोफखान्याची मारक क्षमता वाढविण्यासाठी दिव्यास्त्र बॅटरी आणि लाईटर म्युनिशन बॅटरी तैनात केल्या आहेत. तसेच प्रत्येक पायदळ बटालियनमध्ये ड्रोन प्लाटूनचा समावेश केला आहे. याशिवाय सीमेवर शत्रूला धक्का देण्यासाठी भैरव नावाची चपळ आणि घातक विशेष दलाची स्थापना करण्यात आली आहे.