२ तास ७ मिनिटांत मुंबई ते अहमदाबाद प्रवास

yongistan
By - YNG ONLINE
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
भावनगर : वृत्तसंस्था
भारताची पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच मुंबई ते अहमदाबाद मार्गावर सुरू होणार आहे. एकदा का ही रेल्वे सेवा सुरू झाली तर मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरातील अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत (१२७ मिनिटे) पार करता येणार आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. 
गुजरातमधील भावनगर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भावनगर येथून सुरू होणा-या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी रेल्वे मंत्री भावनगर येथे आले आले होते. यावेळी त्यांनी भावनगर टर्मिनस येथून अयोध्या एक्स्प्रेस, रेवा-पुणे एक्स्प्रेस आणि जबलपूर-रायपूरला जोडणा-या एका नव्या ट्रेनचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणारी बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरू आहे. जेव्हा बुलेट ट्रेन धावायला लागेल, तेव्हा मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी केवळ दोन तास सात मिनिटांचा वेळ लागेल.
डिसेंबर २०२९ मध्ये 
पूर्ण होऊ शकते काम
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत उत्तर देताना वापी आणि साबरमतीदरम्यानच्या भागाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प (महाराष्ट्र ते साबरमती) डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तथापि, बुलेट ट्रेन प्रकल्प हा अतिशय गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे मुदतीत हे काम पूर्ण होणार का, यावर प्रश्नचिन्ह आहे.