वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या वकील मथुरा श्रीधरन या ओहायो येथे सॉलिसिटर जनरल बनल्या आहेत. ऍटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी त्यांची नियुक्ती केली. मात्र यानंतर मथुरा श्रीधरन यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. हे पद अमेरिकन व्यक्तीला का दिले गेले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना डेव्ह योस्ट यांनी मथुरा श्रीधरन एक अमेरिकन नागरिक आहेत आणि त्यांचे पतीदेखील अमेरिकन नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना पद दिल्याचे स्पष्ट केले.
ऍटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी ओहायोच्या १२ व्या सॉलिसिटर जनरल म्हणून श्रीधरन यांची निवड केली आहे. वर पोस्ट करत योस्ट यांनी ही घोषणा केली होती. योस्ट यांनी मथुरा यांचे वर्णन प्रतिभावान वकील म्हणून केले होते. तसेच त्या राज्याची चांगली सेवा करतील असेही म्हटले होते.
मथुरा श्रीधरन यांनी २०१८ मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याची पदवी (ज्युरिस डॉक्टर) घेतलेली आहे. मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदव्युत्तर पदवी, मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अर्थशास्त्र आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयात बॅचलर पदवी प्राप्त केली.
मथुरा श्रीधरन यांना ओहायोचे अॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी ओहायोचे १२ वे सॉलिसिटर जनरल म्हणून बढती दिली. यापूर्वी श्रीधरन यांनी अॅटर्नी जनरल कार्यालयात ओहायो टेन्थ कमांडमेंट सेंटरमध्ये संचालकपदावर काम केले. ओहायो सॉलिसिटर ऑफिसमध्ये काम करण्यापूर्वी श्रीधरन यांनी यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द सेकंड सर्किटचे न्यायाधीश स्टीवन जे. मेनाशी आणि न्यू यॉर्कच्या दक्षिण भागासाठी यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश डेबोरा ए. बॅट्स यांच्यासाठी लिपिक म्हणून काम केले होते. त्यांचे लग्न अश्विनी सुरेश यांच्यासोबत २०१५ मध्ये झाले आहे.