मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून, कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर टीकेचे आसून ओढले. स्पर्धक कंपनीपेक्षा ३ हजारांहून अधिक कोटींची बोली बोलल्यानंतरही मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ठाणे-बोरिवली बोगद्याचे काम देणे, शालार्थ आयडी घोटाळ््यावर पांघरून घालणे यावरून सरकारला खडे बोल सुनावतानाच शेतकरी आत्महत्यांसह अनेक प्रश्नांवरून दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागील ५ महिन्यांत राज्यात १ लाख ६० हजार गुन्हे घडले असून, ९२४ हत्या झाल्याचे ते म्हणाले.
राज्यात रोज ६ हत्या होतात तर ३ हजार ५०६ बलात्कार झाले. या घटनांमध्ये जवळचे लोक एवढे हिंमत का करतात, असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात १० हजार ४०० गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुणे, संभाजीनगर, नाशिक येथे अनेक मोठे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारीत महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर टोळ््या सक्रीय असून, भाईगिरी सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.
अनेक विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. प्रचारात स्वच्छ प्रशासन म्हणतात. मात्र, रोज घोटाळे बाहेर येतात. सत्ताधारी मंत्री भ्रष्टाचार करीत असताना काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारमधील मंत्र्यांच्या समोर आलेल्या घोटाळ््यांबाबत दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारच्या विविध
खात्यांत भ्रष्टाचार
सरकारच्या विविध खात्यांत भ्रष्टाचार बोकाळलेला असून, मंत्री कमिशनशिवाय कोणतेही काम करीत नसल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. आतापर्यंत किती तरी भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर आली आहेत. परंतु सरकार यावर लक्ष देऊन कारवाया करण्याऐवजी या भ्रष्टाचा-यांना पाठिशी घालण्याचे काम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.