मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.
चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष पुरस्कार मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार दिग्गज मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव विशेष योगदान पुरस्कार सुपरस्टार अभिनेत्री काजोलला प्रदान करण्यात आला.
भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार
गझलकार भीमराम पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार (२०२५) प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारासह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा या नवीन पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली.
