ट्रम्प यांची आयात शुल्कवाढ बेकायदा

yongistan
By - YNG ONLINE



अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अधिकार नाही, अमेरिकन न्यायालयाचा निकाल

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याअंतर्गत (आयईईपीए) भारतासह अन्य देशांवर आयातशुल्क लागू केले, त्यापैकी बहुतांशी अधिकार बेकायदा असल्याचा निकाल शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी अमेरिकेच्या फेडरल अपील्स न्यायालयाने दिला. मात्र, सध्या वाढीव आयातशुल्क लागू राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

अमेरिकेच्या कोर्ट ऑफ अपिल्स फॉर द फेडरल सर्किटच्या न्यायाधीशांनी ७ विरुद्ध ४ अशा बहुमताने दिलेल्या निकालात असे नमूद करण्यात आले आहे की, ट्रम्प यांना राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्याचा आणि जगातील जवळपास प्रत्येक देशावर आयातशुल्क लादण्याचा अधिकार नाही. यापूर्वी मे महिन्यात न्यूयॉर्कमधील विशेष फेडरल ट्रेड न्यायालयाने अशाच स्वरुपाचा निकाल दिला होता. ट्रम्प यांना आयातशुल्क लादण्याचे अमर्यादित अधिकार देण्याची कॉंग्रेसची इच्छा आहे, असे दिसत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, न्यायालयाने आयातशुल्क तातडीने रद्द करण्याचे निर्देश दिले नाहीत. फेडरल न्यायालयाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला वेळ दिला आहे. 

दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाचा अंतिम विजय होईल, अशी आशा व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी व्यक्त केली. ट्रम्प यांनी कायदेशीरपणेच कृती केली आहे, असे ते म्हणाले तर या निकालाला आव्हान दिले जाईल, असे ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे स्पष्ट केले. फेडरल न्यायालयाचा निकाल कायम राहिला तर यामुळे अमेरिका उद्ध्वस्त होईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.