सातनवरी ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे परत चला असा संदेश देत ग्रामीण भारताचे देश विकासात महत्व अधोरेखित केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही गाव करी ते राव न करी असे उद्बोधन करुन आदर्श ग्रामीण भारताची संकल्पना ग्रामगीता या ग्रंथातून मांडली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व व पुढाकाराने हा ग्रामीण भारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्मार्ट व इंटेलिजंट होण्याच्या दृष्टीने पाऊल पुढे पडले आहे.
नागपूर ग्रामीणमधील सातनवरी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रायोगिक तत्वावर ऑगस्ट २०२५ मध्ये देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ केला. स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, मत्स्यव्यवसाय, सिंचन, आरोग्य, शिक्षण, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी आदी १८ सेवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या व मुख्यत्वे भारतीय कंपन्यांद्वारे पुरविल्या जात असल्याने हे एक आत्मनिर्भर भारताद्वारे समृद्ध गाव करण्यासाठीचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
महाराष्ट्राने भारत देशाला स्वातंत्र्य करण्यात व येथील सामाजिक उत्थानासाठी मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्योत्तर भारताला रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, महिलांना आरक्षण असे क्रांतीकारी पाऊल उचलत पुढे देशभर त्याची अंमलबजावणी झाली आहे. महाराष्ट्राने देशाला दिलेल्या या महत्वाच्या योगदानात आता स्मार्ट व इंटेलिजंट गावाची भर पडणार आहे. देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ करतानाच राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील १० असे सुमारे ३ हजार ५०० गावे पहिल्या टप्प्यात स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलवून समृद्ध गावांद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या शतक वर्षपूर्ती निमित्त संपूर्ण विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात ग्रामीण भारत तंत्रज्ञानाद्वारे विकास पथावर अग्रेसर करण्याची घोषणा करत भारतनेट हा गावा-गावांना इंटरनेटद्वारे जोडण्याचा व पर्यायाने जगाशी ग्रामीण भारताचा संवाद घडविण्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रात भारतनेट उपक्रमांतर्गत २०१९ मध्ये पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी झाली व दुसऱ्या टप्प्यासही सुरूवात झाली. राज्याने भारतनेटच्या धर्तीवर महानेट कार्यक्रम हाती घेत त्याची अमंलबजावणीही सुरू केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने विविध महत्वाचे निर्णय घेवून राज्याला सर्व क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी पुढाकार घेतला असून कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराद्वारे प्रशासनाला गती व सर्व सामान्यांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही निर्णय घेण्यात आले. ग्रामीण महाराष्ट्रालाही उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व पर्यायाने गावातील सामान्य माणसाला सबळ करण्यासाठी स्मार्ट व इंटेलिजंट बनविण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी हाती घेतला.
असे होत आहे सातनवरी स्मार्ट व इंटेलिजंट
सातनवरी गाव इंटरनेट सुविधांनी पूर्णपणे जोडण्यात आले आहे. वायफाय, हॉटस्पॉट आदींचा उपयोगही मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ग्रामपंचायत ते गावातील घरे, संस्था आणि गावात वायफाय, फायबर टु द होम (फटीटीएच), सॅटेलाईट सुविधा, ४ जी, ५ जी व अन्य वायरलेस तंत्रज्ञानाचा उपयोग करून ब्रॉडबॅन्डची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करून देण्यात आली आहे. स्मार्ट शेतीला प्राधान्य देवून गावातील शेतांमध्ये सेन्सर बसविण्यात आले आहे. याद्वारे शेतीतील पेरणीपासून कापणीपर्यंत तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, माहिती, पीक पद्धतीचे नियोजन आदी सर्व माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध झाली आहे.