द ट्रम्प ऑर्गनायझेशन, कंपनी, २०२४ मध्ये भारतीय प्रकल्पांतून १० लाख डॉलर्स कमावले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन या उद्देशाने विविध देशांवर टॅरिफ लादले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले असून त्याची अंमलबजावणी २७ ऑगस्टपासून होत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ वाढवले होते. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था मृत असल्याची टीका केली होती. डोनाल्ड ट्रम्प हे राजकीय नेते असल्याबरोबर यशस्वी उद्योजकदेखील आहेत. भारतात डोनाल्ड ट्रम्प यांचा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. ट्रम्प यांच्यासाठी अमेरिकेनंतर भारत सर्वाधिक नफा देणारे रिअल इस्टेट मार्केट आहे. त्यांच्या कंपनीने २०२४ मध्ये तब्बल १० लाख डॉलर्सची कमाई केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंदर्भात कोणतीही वक्तव्य केली असली तरी भारत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात चांगली पकड आहे. द ट्रम्प ऑर्गनायझेशन या कंपनीला अमेरिकेनंतर भारत हे सर्वाधिक आणि सर्वांत मोठा नफा देणारे रिअल इस्टेट मार्केट बनले आहे. डोनाल्ड ट्रम्प भारतात जमीन खरेदी करत नाहीत किंवा बांधकामात थेट पैसे गुंतवत नाहीत. ते फक्त त्यांचा ट्रम्प या नावाचा ब्रँड भारतीय डेव्हलपर्सला वापरण्याची परवानगी देतात. त्याच्या बदल्यात मोठी रक्कम आणि विक्रीमध्ये भागिदारी मिळवतात.
एका रिपोर्टनुसार २०२४ मध्ये ट्रम्प ऑर्गयनायझेशनला भारतीय प्रोजेक्टमधून १० लाख डॉलर्सची कमाई झाली. त्यात मंबईतील एका टॉवरच्या निर्मितीतून मिळालेल्या उत्पन्नाचा वाटा अधिक होता. २०१२ मध्ये द ट्रम्प ऑर्गनायझेशनने भारतात त्यांचा पहिला प्रोजेक्ट लाँच केला होता. २०१२-२०१९ दरम्यान त्यांनी मुंबई, पुणे, गुरुग्राम, कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये ४ प्रकल्पांतून रॉयल्टी आणि फीच्या माध्यमातून ११.३ मिलियन डॉलर ट्रम्प यांना मिळाले.
सध्या मुंबई, पुणे, गुरुग्राम, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडासारख्या मोठ्या शहरांत १३ हून अधिक आलिशान प्रकल्पांतून ट्रम्प मोठी कमाई करत आहेत. २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी रिअल इस्टेटचा व्यवसाय ३० लाख क्वेअर फुटांपर्यंत वाढवला आहे. ६ नवे प्रकल्प पूर्ण झाल्यास कंपनीचा विस्तार चारपटीने वाढेल. ट्रम्प यांचे भारतीय रिअल इस्टेट व्यवसायावर बारीक लक्ष असून, केवळ ब्रँड वापरण्यासाठी त्यांना रग्गड पैसा मिळत आहे. भविष्यातही या ब्रँडचा विस्तार वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून, ट्रम्प यांचे यावर बारीक लक्ष आहे.
भारतातून आतापर्यंत
१७५ कोटी कमावले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीने भारतातून आतापर्यंत १७५ कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत तर आगामी प्रकल्पांतून त्यांना १५ हजार कोटींचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. दरमहा विचार केला असता ट्रम्प यांना भारतातून प्रत्येक महिन्याला १० ते १५ कोटी रुपयांचा फायदा होतो. असे असतानाही ट्रम्प यांनी भारतावर कर लादून वेगळी कमाई करण्याचा डाव रचला आहे.
