विदेशी गुंतवणूकदारांचा शेअर्स विकून काढता पाय!

yongistan
By - YNG ONLINE


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणा-या वस्तूंवर तब्बल ५० टक्के टॅरिफ वाढविला. आधी २५ टक्के आणि त्यानंतर लगेचच २५ टक्के टॅरिफ वाढवून भारताला धक्का दिला. त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर तीव्र पडसाद उमटू लागले असून, या पार्श्वभूमीवर जुलै (२०२५) महिन्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेतल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल ३२ हजार कोटींच्या शेअर्सची विक्री केली. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराला धक्का बसला आहे. 

अमेरिकेसह सिंगापूर, नेदरलँड आणि जपानच्या विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील भागीदारी विकली. या चार देशांतील गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून २२३५० कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. सर्वाधिक विक्री सिंगापूरच्या गुंतवणूकदारांनी केली. त्यांनी शेअर बाजारातून ११६७० कोटी आणि डेब्ट मार्केटमधून ७६०० कोटी रुपये काढून घेतले. अमेरिकेतील गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारातून ९३३३ कोटी रुपये काढून घेतले तर डेब्ट मार्केटमधून १२३० कोटी रुपये काढले. नेदरलँडमधील गुंतवणूकदारांनीही भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक कमी केली. मात्र, डेट मार्केटमध्ये २५७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. जपाननेही शेअर बाजारातून ५३७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली तर डेट मार्केटमध्ये ७४२० कोटी रुपयांची विक्री केली.  ही आकडेवारी एनएसडीएलने जारी केलेली आहे. हे आकडे भारताच्या इक्विटी, डेट आणि हायब्रीड इंस्ट्रूमेंटसमध्ये गुंतवणूक करणा-या १० टॉप देशांची निव्वळ गुंतवणूक दाखवतात. जुलै महिन्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकारांनी भारतीय मार्केटमधून ३१९८८ कोटी रुपयांची विक्री केली. या विक्रीमुळे शेअर बाजारावर परिणाम झाला.