भारताचा कच्चे तेल आयात खर्च ९ अब्ज डॉलर्सने वाढणार!

yongistan
By - YNG ONLINE



नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारत आपल्या गरजेपेक्षा अधिक कच्चे तेल स्वस्त दरात रशियाकडून आयात करतो. मुळात भारताने रशियाकडून तेल आयात करणेच मान्य नाही. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी भारताला इशारा दिला. परंतु भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरूच आहे. त्यामुळे अमेरिकेने भारतातून येणा-या वस्तूंवर पहिल्यांदा २५ टक्के आणि त्यानंतर आणखी २५ टक्के असा तब्बल ५० टक्के आयात कर वाढविला. अमेरिकेच्या या दबावाला बळी पडून भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी थांबविली तर भारताचा कच्चे तेल आयातीचा खर्च तब्बल ९ अब्ज डॉलर्सने वाढेल आणि तो १२ अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल, असे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे.


चीननंतर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करीत आहे. यामुळे अमेरिकेने भारताला लक्ष्य केले आणि भारतीय आयात वस्तूंवर ५० टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला. यामध्ये रशियाकडून तेल खरेदी केल्यास २५ टक्के दंड लावणार असल्याचीही घोषणा केली. यासंदर्भात भारतातील सर्वांत मोठी सरकारी बँक  एसबीआयने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अमेरिकेच्या दबावाखाली भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवले तर कच्चे तेल आयात करण्याचा खर्च ९ अब्ज डॉलर्सने वाढून १२ अब्ज डॉलर्स होऊ शकतो. भारताने २०२६ च्या उर्वरित आर्थिक वर्षात रशियाकडून तेल खरेदी केले नाही तर कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल ९ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते तर पुढील आर्थिक वर्षात हे बिल ११.७ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते, असे म्हटले आहे.

गेल्या काही वर्षात भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी केली आहे आणि हा पुरवठा थांबला तर भारताला इतर देशांकडून जास्त किमतीत तेल खरेदी करावी लागू शकते. सध्या रशिया जगाला विकतो त्या कच्च्या तेलाच्या १० टक्के भारत खरेदी करतो. भारताने २०२२ पासून रशियाकडून तेल खरेदी वाढवली होती आणि रशियाने सवलतीत तेलाचा पुरवठा वाढवला होता. रशियाने भारतासाठी प्रति बॅरल ६० अमेरिकन डॉलर्सपर्यंत किंमत निश्चित केली. विशेष म्हणजे पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आणि युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियन तेल खरेदी बंद केली म्हणूनच भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे.

अशा परिस्थितीत आता सर्व देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती सुमारे १० टक्के वाढू शकतात. रशियाकडून तेल खरेदी करून भारताला खूप फायदा झाला आणि २०२० च्या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण खरेदीत रशियाचा वाटा फक्त १.७ टक्के होता पण २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात ३५.१ टक्क्यापर्यंत वाढला. युक्रेन युद्धापूर्वी भारत बहुतेक तेल इराककडून खरेदी करायचा. त्यानंतर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीतून भारताला तेलाचा पुरवठा होत होता.