अमेरिकेच्या दबावानंतर मोदी-पुतीन यांच्यात फोनवरून संवाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-रशिया संबंधावरून एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतावर कराचा मोठा बोजा लादत आहेत. त्यामुळे भारतावर दबाव वाढत चालला आहे. परंतु अशा स्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत आज फोनवर चर्चा केली. या चर्चेमुळे जुना मित्र असलेला रशिया भारताच्या मदतीला धावून येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, यावेळी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी यूक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धासंदर्भातील स्थितीची माहिती नरेंद्र मोदी यांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भारत दौ-याचे आमंत्रण दिले. त्यामुळे आगामी काळात भारत-रशियाचे संबंध आणखी दृढ होण्याची शक्यता आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांना यूक्रेन युद्धासंदर्भातील ताज्या घडामोडींची अपडेट दिली. नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांनी दिलेल्या सविस्तर माहितीसंदर्भात धन्यवाद दिले. रशिया-यूक्रेन संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवावा, ही भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. या संवादादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना या वर्षाच्या अखेरीस होणा-या भारत- रशियाच्या वार्षिक द्विपक्षीय शिखर संमेलनासाठी भारतात येण्याचे निमंत्रण दिले. रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दौ-यावर आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याची आणि त्याला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केलीे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्यातील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले. त्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त २५ टक्के कर लादला. तसेच रशियासोबत शस्त्र आणि तेल खरेदी संदर्भातील व्यापार सुरू ठेवल्याने दंड आकारण्याची धमकी दिली. यावरही दोन्ही प्रमुखांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
भागीदारी भक्कम करण्यावर एकमत
नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील संबंध आणि द्विपक्षीय अजेंडा यामध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशांमध्ये विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त राजनैतिक भागीदारी अधिक वाढवण्याबाबत कटिबद्ध राहण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
भारत-चीनमधील
संबंधही सुधारणार?
अमेरिका भारतावर सातत्याने टीका करीत असतानाच भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या बैठकीसाठी चीनला जाणार आहेत. त्यामुळे भारत-चीनमधील संबंध सुधारले जाऊ शकतात. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात तियानजीन येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिनही उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोदी-जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.