ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार

yongistan
By - YNG ONLINE

 


अधिनियमात सुधारणा करणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 

मुंबई : प्रतिनिधी 

राज्यातील शेतक-यांना शेतमालाला रास्त आणि  वाजवी भाव मिळावा यासाठी ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून आकारण्यात येणारी देखरेख शुल्काची रक्कम सरकारऐवजी पणन विभागाला सुपूर्द करावी, अशी सुधारणाही अधिनियमात करण्यात येणार आहे. 

या अधिनियमातील सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्तरावर सनिंयत्रण समिती स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र आणि  राज्य सरकार, कृषि उत्पन्न बाजार समितीतील कृषि उत्पन्नाच्या व्यापारामधील अडसर कमी व्हावा, यासाठी राज्यातील १३३ कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ई-नाम योजना राबवित आहे. कृषि उत्पन्नाच्या व्यापारासाठी ऑनलाईन पद्धती कार्यान्वित करीत आहे. पण अजूनही राज्यात ई-नाम अंतर्गत सिंगल युनिफाइड लायसन्सची तरतूद नसल्याने, इंटरमंडी आणि इंटर स्टेट ट्रेड सुरु होऊ शकलेले नाहीत. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या  कृषि आणि  शेतकरी कल्याण विभागाने कृषि उत्पन्न आणि पशुधन पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, २०१७ (मॉडेल अ‍ॅक्ट) प्रकाशित केला आहे. या अनुषंगाने राज्याच्या महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासाठी सन २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आले होते. 

तरतुदीत सुधारणांसाठी 

मंत्रिमंडळ उपसमिती

विधेयकातील तरतुदींबाबत सुधारणांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या उपसमितीने सुधारणांची शिफारस केली आहे. त्यानुसार केंद्राच्या मॉडेल अ‍ॅक्ट मधील तरतुदीनुसार राज्यातील ज्या मोठ्या बाजार समित्यांकडे अन्य किमान २ राज्यांतून शेतमाल येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय नामांकित बाजार समित्या घोषित करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. अशा बाजार समित्या राष्ट्रीय नामांकित बाजार समित्या घोषित केल्यानंतर या बाजार समित्यांवर राज्य सरकारचे थेट नियंत्रण होऊन निर्णय प्रक्रिया, पणन प्रक्रिया सुलभतेने आणि  वेगाने होणार आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या  सदर मॉडेल अ‍ॅक्ट २०१७ नुसार ह्लसिंगल युनिफाइड लायसन्सह्व संदर्भातील तरतुदींचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे.