पीडितांना १० लाखांची भरपाई, ६ महिन्यांत निवडणुका घेणार
काठमांडू : वृत्तसंस्था
जनरेशन झेड चळवळीत मृत्युमुखी पडलेल्यांना शहीद दर्जा तसेच पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख नेपाळी रुपये भरपाई दिली जाईल, अशी घोषणा पदभार स्वीकारल्यानंतर नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी केली. या हिंसाचारात ५१ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका भारतीय महिलेचाही समावेश आहे. कार्की यांनी भ्रष्टाचार संपवण्याची शपथही घेतली.
अंतरिम पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्की यांनी सांगितले की, मी ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ सत्तेत राहणार नाही आणि नवनिर्वाचित संसदेकडे सत्ता सोपवीन. १२ सप्टेंबर रोजी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर कार्की यांना ५ मार्च २०२६ रोजी नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची जबाबदारी देण्यात आली.
पंतप्रधान झाल्यानंतर सुशीला कार्की मंत्रिमंडळ स्थापनेवर काम करत आहेत. काठमांडू पोस्टनुसार कार्की १५ पेक्षा जास्त मंत्र्यांसह मंत्रिमंडळ स्थापन करू शकतात. मंत्रीपदांसाठी विचारात घेतलेल्या नावांमध्ये कायदेतज्ज्ञ ओम प्रकाश अर्याल, माजी लष्करी अधिकारी बालानंद शर्मा, निवृत्त न्यायमूर्ती आनंद मोहन भट्टराई, माधव सुंदर खडका, आशिम मान सिंह बसन्यात आणि ऊर्जातज्ज्ञ कुलमन घिसिंग यांचा समावेश आहे. यासोबतच डॉ. भगवान कोइराला, डॉ. संदुक रुईत, डॉ. जगदीश अग्रवाल आणि डॉ. पुकार चंद्र श्रेष्ठा यासारख्या लोकांची नावे विचारात घेतली जात आहेत. जनरल-झेडचे सदस्यही या निर्णयात सहभागी होत आहेत. यासाठी ते ऑनलाइन मतदानाचा आधार घेत आहेत.