पानिपतकारांची एकमताने निवड, जानेवारीमध्ये संमेलन
पुणे : प्रतिनिधी
सातारा येथे होणा-या आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी एकमताने निवड करण्यात आली. येत्या दि. १, २, ३, ४ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी विश्वास पाटील यांच्यासमवेत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी महत्तवाची भूमिका बजावणा-या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, नेमाडे यांनी अधीच नकार दिला होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक आज सकाळी ११ वाजता पुण्यात पार पडली. यावेळी साहित्य महामंडळाच्या विविध शाखांकडून वेगवेगळ््या साहित्यिकांची नावे सूचविण्यात आली होती. यामध्ये पानिपतकार विश्वास पाटील यांच्यासह रंगनाथ पठारे, बाळ फोंडके, भालचंद्र नेमाडे आदींची नावे आघाडीवर होती. मात्र, यावेळी विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महामंडळ अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महामंडळाच्या सर्व घटक संस्थांनी अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव सुचविले. त्यानुसार बैठकीत निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या बैठकीत साहित्य संमेलनाची ४ दिवसीय कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली. ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, आणि बालकुमार आनंद मेळावा याची सुरुवात १ जानेवारी रोजी म्हणजे पहिल्या दिवशी होणार आहे तर दुस-या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे, असे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. सातारा येथील शाहू स्टेडियम येथे हे संमेलन होणार आहे. साहित्य परिषदेची शाहुपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांनी संयुक्तपणे संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाचे माजी अध्यक्ष, महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच सरस्वती सन्मान प्राप्त आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना निमंत्रण देण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
साता-यात चौथ्यांदा होणार संमेलन
सातारा येथे यापूर्वी तीन साहित्य संमेलन पार पडली आहेत. आता हे चौथे संमेलन होणार आहे. स्टेडियमची क्षमता साधारण २५ हजार इतकी आहे. तेथे विविध सभागृहात कार्यक्रम होणार आहेत. मुख्य मंडप आणि ग्रंथ प्रदर्शन तेथेच असणार आहे. संमेलन हे राजकीय व्यासपीठ होणार नाही, याची काळजी घेऊ. वेगवेगळ््या दिवशी वेगवेगळे नेतेमंडळी येतील, याची काळजी घेऊ, असे जोशी म्हणाले.