नवी दिल्ली : २०१८ नंतर पहिल्यांदाच रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रथमच खग्रास चंद्रग्रहणाचा योग आला. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसले आणि साध्या डोळ््यांनी ते पाहता आले. खग्रास चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींनी गर्दी केली होती. यंदाच्या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण देशाच्या अनेक भागांमध्ये दिसले. हे ग्रहण दि. ७ सप्टेबर २०२५ रोजी रात्री ९.५८ वाजता सुरू झाले आणि रात्री १.२६ ला संपले. फक्त भारतच नाही तर इतरही काही देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसले आहे.
पांढरा शुभ्र चंद्र हळूहळू पृथ्वीच्या सावलीत झाकोळत गेला. त्यानंतर रंग बदलत लालसर झाला. चंद्रग्रहण सुरू झाले, तेव्हा चंद्रावर अंधार होताना बघायला मिळाला. महाराष्ट्रातही सर्वत्र चंद्रग्रहण पाहायला मिळाले. रविवारच्या रात्री हजारो खगोलप्रेमींनी आकाशातील हा भव्य आणि दुर्मिळ खगोलीय देखावा आपल्या छतावरून, टेलिस्कोपद्वारे तसेच साध्या डोळ््यांनी न्याहाळला. चंद्र पृथ्वीच्या सावलीत आला. चंद्र जसजसा पुढे जात होता, तसतसा चंद्राचा भाग अंधारात जाताना दिसला.काही मिनिटे चंद्र दिसेनासा झाला. पण नंतर पुन्हा दिसायला लागला. चंद्र अंधारात गेल्यानंतर काही वेळाने चंद्राचा काही भाग लालसर दिसायला लागला. लाल प्रकाशाचा चंद्राचा काही भाग हळूहळू उजेडात यायला लागला. लाल प्रकाश अर्ध्या चंद्रावर पोहोचला.सूर्य प्रकाशाचे अपस्करण झाले. हा प्रकाश हळूहळू चंद्रापर्यंत पोहोचला. त्यामुळे चंद्र लालसर दिसायला लागला. दिल्लीत ब्लड मून दिसला. तो क्षण कॅमे-यात कैद झाला. सर्वांत आधी केरळच्या तिरुवनंतपुरम येथे ब्लड मून पाहायला मिळाला. यावेळी चंद्र पूर्णपणे लालसर झाला होता.