मास्को : वृत्तसंस्था
रशियाने तयार केलेल्या कॅन्सरच्या लसीने प्रीक्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आता ही लस वापरासाठी सज्ज आहे. ३ वर्षांपासून केलेल्या चाचण्यांमधून त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध झाली आहे. ही माहिती रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीचे प्रमुख वेरोनिका स्कवोर्त्सोवा यांनी दिली. या लसीवर अनेक वर्षांपासून संशोधन केले जात आहे आणि त्याच्या प्रीक्लिनिकल चाचण्या ३ वर्षे घेण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
ही लस वापरासाठी सज्ज आहे. आता आम्ही अधिकृत मंजुरीची वाट पाहात आहोत. वारंवार वापरल्यानंतरही लसीचा परिणाम खूप चांगला होता. संशोधकांना ट्यूमरच्या आकारात ६० टक्के ते ८० टक्के घट दिसून आली. लसीचे प्रारंभिक लक्ष्य कोलोरेक्टल कर्करोग असेल. याशिवाय ग्लिओब्लास्टोमा आणि विविध प्रकारच्या मेलेनोमासाठी लसी विकसित करण्यातही चांगली प्रगती झाली आहे, असेही वेरोनिका यांनी म्हटले आहे. एफएमबीएचे प्रमुख वेरोनिका स्कवोर्त्सोवा यांनी सांगितले की रशियन एंटरोमिक्स कॅन्सर व्हॅक्सीन आता वापरासाठी तयार आहे. एमआरएनए बेस्ड या व्हॅक्सीनमध्ये सर्व प्रकारच्या प्री-क्लीनिकल टेस्टना यशस्वीपणे पार केले. त्यामुळे ही लस सुरक्षित आणि प्रभावशील सिद्ध झाली आहे. चाचणीदरम्यान ट्यूमरचा आकार कमी आणि ट्यूमरचा विकास खुंटल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय या अभ्यासात या लसीमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यात यशात वाढीचा संकेत मिळाला आहे. रशियाच्या कॅन्सर प्रतिबंधक लसीने चाचण्यात चांगली कामगिरी केली आहे. स्कवोर्त्सोवा यांनी इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये याची घोषणा केली.
रशियाने विकसित केलेली लस ही एमआरएनए लस आहे. प्रत्येक रुग्णाच्या आरएनएनुसार ती उत्तेजित केली जाईल. जर लसीला मंजुरी मिळाली तर केमोथेरपीची आवश्यकता राहणार नाही. ब्रिटिश सरकार जर्मनीच्या बायोएनटेकच्या सहकार्याने कर्करोगाची लस विकसित करीत आहे. अमेरिकन औषध कंपन्या मॉडर्ना आणि मर्कदेखील त्वचेच्या कर्करोगाशी लढण्यासाठी लस विकसित करीत आहे.