२२ सप्टेंबरपासून अंमल, दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने जीएसटीच्या ४ स्लॅबपैकी १२ टक्के आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला असून, आता सर्व वस्तू ५ टक्के आणि १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. या नव्या जीएसटी रचनेची बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी घोषणा करण्यात आली. येत्या २२ सप्टेंबरपासून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून नवीन जीएसटी रचना लागू होणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात निर्णय घेण्यात आला असून, यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत.
नवी दिल्लीत ५६ व्या जीएसटी कौन्सिलची दोन दिवसीय बैठक आज सुरू झाली. पहिल्याच दिवशी जीएसटीचे २ स्लॅब रद्द करण्याची घोषणा केली. स्वातंत्र्यदिनीच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये बदल होणार असल्याचे जाहीर केले होते. त्या घोषणेवर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आता जीएसटीचा १२ टक्के आणि २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे ज्या वस्तूंवर आधी २८ टक्के जीएसटी होता. त्यावर आता १८ टक्के जीएसटी लागणार आहे. तसेच आधी १२ टक्के जीएसटी असणा-या वस्तूंवर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे तर काही वस्तूंवरील जीएसटी हा शून्य टक्के करण्यात आला. नव्या रचनेत आलिशान गाड्या, साखरेचे पेय, फास्ट फूड महागणार असून लक्झरी वस्तूंसाठी ४० टक्के कर लागणार आहे. पान मसाला, गुटखा, दारू आदी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागणार आहे. यासोबतच वैयक्तिक विमा पॉलिसी, आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त करण्यात आल्या. यामुळे आता विमा खरेदी स्वस्त झाली. सिमेंटवरील जीएसटीही २८ टक्क्यांवरून १८ टक्के, अनेक औषधांवरील जीएसटी शून्यावर आणला आहे. छोट्या कार, दुचाकी, टीव्ही या वस्तूही २८ टक्के जीएसटीवरून १८ टक्क्यांवर आणल्या. पिझ्झा, ब्रेड, दुधावर जीएटी नाही.
जीएसटी कौन्सिलने २५०० रुपयांपर्यंतच्या चपला आणि कपड्यांवरील जीएसटी ५ टक्क्यांच्या कक्षेत आणला. आतापर्यंत १००० रुपयांपर्यंतच्या चपला आणि कपड्यांवर ५ टक्के जीएसटी होता तर जास्त किमतीच्या उत्पादनांवर १२ टक्के जीएसटी होता. मात्र, आता २५०० रुपयांपर्यंतच्या चपला आणि कपडे ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणले. त्यामुळे चपला आणि कपडे स्वस्त होणार आहेत. यासोबतच दैनंदिन वापरातील शाम्पू, साबण, तेल, दैनंदिन वापरातल्या घरगुती वस्तू, नमकीन, पास्ता, कॉफी, नूडल्सवर ५ टक्के जीएसटी लागणार आहे. ३३ जीवनरक्षक औषधी जीएसटी कक्षेबाहेर ठेवण्यात आल्या.
या वस्तू स्वस्त होणार
-रोटी, पनीर आणि दूध : यामध्ये सर्व प्रकारच्या रोटी, पनीर, प्रोसेस्ड दुधावरील कर पूर्णपणे रद्द, दैनंदिन जीवनातील वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू होणार
-कृषी उत्पादने : कृषी उत्पादनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के लागू होणार. खते, किटकनाशके, ट्रॅक्टर अवजारे, स्पेअर पार्टसचा जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर
-घर, बांधकाम साहित्य : सिमेंटवर २८ टक्क्यांवरून १८ टक्के जीएसटी
औषधे : कॅन्सर आणि रेअर ड्रग्सवर जीएसटी कमी
-वाहन क्षेत्र : ऑटोमोबाईल क्षेत्रातील वस्तूंना आता १८ टक्के जीएसटी. बस, ट्रक, अॅम्ब्युलन्स, थ्री-व्हीलर आणि ऑटो पार्टसवरील करात घट
-दैनंदिन वस्तू : साबण, टूथपेस्ट, शॅम्पू यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के किंवा शून्य टक्के करण्याची तयारी
इन्शुरन्स : इंडिव्हिज्युअल हेल्थ, लाइफ व रिइन्शुरन्स पॉलिसींवरील कर पूर्णपणे रद्द. टर्म लाइफ, युलिप, एंडोमेंट पॉलिसी, फ्लोटर पॉलिसी व वरिष्ठ नागरिकांसाठीच्या पॉलिसींवर पूर्ण सूट
विशेष ४० टक्के श्रेणी : सिन गुड्स जसे की पान मसाला, तंबाखू तसेच अल्ट्रा लक्झरी वस्तूंवर ४० टक्के कराचा स्लॅब लागू होणार आहे.