देशात ९७ लाख प्रदूषित वाहने

yongistan
By - YNG ONLINE

 


वाहने रद्द केल्यास ४० हजार कोटींचा फायदा होणार, ७० लाख रोजगाराच्या संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

जीएसटी सुधारणांमुळे ऑटो क्षेत्राला सर्वाधिक फायदा होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच ऑटो कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कमाईचा एक नवीन मंत्र दिला. यासोबतच त्यांनी ऑटो उद्योगाला एक मोठा संदेश देत देशातील ९७ लाख अयोग्य आणि प्रदूषित वाहने रद्द केली तर भारताला जीएसटीमधून ४० हजार कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो, अस गडकरी म्हणाले.

एसीएमएच्या वार्षिक बैठकीत गडकरी म्हणाले की, या व्यापक स्वच्छता मोहिमेमुळे केवळ सरकारी महसूल वाढणार नाही तर ७० लाख रोजगार निर्माण होतील. तसेच ५ वर्षांत जगातील नंबर वन ऑटोमोबाईल उद्योग बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. स्क्रॅपिंगची सध्याची स्थिती खूपच सामान्य आहे. ऑगस्ट २०२५ पर्यंत फक्त ३ लाख वाहने स्क्रॅप करण्यात आली आहेत, त्यापैकी १.४१ लाख सरकारी मालकीची होती. दरमहा सरासरी १६८३० वाहने स्क्रॅप केली जात आहेत. 

ही परिसंस्था तयार करण्यासाठी खाजगी क्षेत्राने २७०० कोटी रुपये गुंतवले आहेत. भारताचे वाहन स्क्रॅपिंग धोरण, ज्याला व्हॉलंटरी व्हेईकल फ्लीट मॉडर्नायझेशन प्रोग्राम असेही म्हणतात, ते पर्यावरणपूरक पद्धतीने जुन्या, असुरक्षित आणि प्रदूषणकारी वाहनांना टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी डिझाइन केलेले आहे. यासंबंधीच्या अहवालानुसार गडकरी यांनी ऑटोमोबाईल उत्पादकांना नवीन वाहन खरेदी करताना स्क्रॅपेज प्रमाणपत्र सादर करणा-या ग्राहकांना किमान ५ टक्के सूट देऊन स्क्रॅपिंगला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. हे दान नाही, कारण त्यामुळे मागणी वाढेल. स्क्रॅपिंग आणि रिप्लेसमेंटचे चक्र उद्योगाची मागणी मजबूत ठेवू शकते.

 उत्सर्जन कमी होणार

स्क्रॅपेज धोरणाची प्रभावी अंमलबजावणी ऑटोमोबाईल घटकांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत कमी करु शकते. कारण पुनर्नवीनीकरण केलेले स्टील, अ‍ॅल्युमिनियम आणि इतर साहित्य पुरवठा साखळीत परत आणले जाईल. तसेच ९७ लाख अयोग्य वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकल्याने उत्सर्जन कमी होईल, इंधनाचा वापर कमी होईल आणि रस्ता सुरक्षा मानके सुधारतील, असे गडकरी म्हणाले.


५ वर्षांत ऑटोमोबाईल 

उद्योग नंबर वन करणार

गडकरी यांनी भारताच्या भविष्यावर भर दिला. त्यांच्या मते भारताच्या सध्याच्या ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार २२ लाख कोटी रुपये आहे तर चीनचा ४७ लाख कोटी रुपये आणि अमेरिकेचा ७८ लाख कोटी रुपये आहे. मला विश्वास आहे की, आपण पुढील ५ वर्षांत भारताचा ऑटोमोबाईल उद्योग जगात नंबर वन बनवू, असे गडकरी म्हणाले.

रस्ते, ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची

भारतातील रस्ते सुरक्षेच्या संदर्भातही गडकरींनी मत व्यक्त केले. जिथे २०२३ पर्यंत ५ लाख अपघात झाले. यामध्ये १.८ लाख मृत्यू झाले होते. त्यापैकी दोन तृतीयांश १८ ते ३४ वयोगटातील असल्याचे गडकरी म्हणाले. जागतिक दृष्टिकोनातून ऊर्जा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे.


देशात दरवर्षी इंधन 

आयातीवर २२ लाख कोटी खर्च

भारत सध्या कच्च्या तेलाच्या आयातीवर दरवर्षी २२ लाख कोटी रुपये खर्च करतो. या आयातीशी संबंधित प्रदूषणामुळे ही समस्या आणखी गंभीर बनली आहे. अवलंबित्व कमी करण्यासाठी शेतीला उर्जेमध्ये विविधीकरण करण्यावर भर दिला. त्यांनी ऊस, तुटलेले तांदूळ आणि इतर पिकांपासून इथेनॉल उत्पादन वाढविण्यात येणार आहे. पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिश्रणासह भारत आधीच ई-२० वरून ई-२७ कडे जात आहे. ब्राझील गेल्या ४९ वर्षांपासून २७ टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवर चालत आहे.