मोहनलाल यांना फाळके पुरस्कार प्रदान

yongistan
By - YNG ONLINE


शाहरुख खानही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज दुपारी ४ वाजता ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपट, लघुपटांना आणि इतर अनेक श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-यांना दिला गेला. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा १ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. सुपरस्टार शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार तर विक्रांत मेसीला ‘१२ वी फेल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

७१ वा राष्ट्रीय चित्रपट सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला. हा बहुप्रतिक्षित सोहळा आज विज्ञान भवनात पार पडला. या सोहळ््याला मागच्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि सिनेसृष्टीमधील प्रतिभावान लोक उपस्थित होते. विधू विनोद चोप्रा यांच्या ‘१२ वीं फेल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार तर ऑफबीट कॉमेडी ‘कटहल-ए जॅकफ्रूट मिस्ट्री’ याला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले. राणी मुखर्जीला ‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’मधील तिच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तर साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठी चित्रपटांनाही पुरस्कार

मराठी चित्रपटांनाही या पुरस्कार सोहळ््यात विशेष स्थान मिळाले. श्यामची आई हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. आत्म पॅम्फलेट या मराठी चित्रपटाला दिग्दर्शनासाठी पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच नाळ दोन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले.