दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ !

yongistan
By - YNG ONLINE


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  निर्णय


मुंबई : प्रतिनिधी 

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या लाभार्थ्यांना यापूर्वी दीड हजार रूपये अर्थसहाय्य दिले जात होते. आता  या निर्णयाने  अडीच हजार रुपये दिले जाईल.

राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार विधवा आदींना दरमहा १ हजार ५००  रुपये अर्थसहाय्य दिले जाते. सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ४ लाख ५० हजार ७०० आणि श्रावणबाळ योजनेत २४ हजार ३ दिव्यांग लाभार्थी आहेत.  या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास आज मान्यता देण्यात आली. हे अनुदान ऑक्टोबर २०२५ पासून देण्यात येईल. यासाठी आवश्यक ५७० कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.


आदिवासी  विद्यार्थ्यांसाठी  शिष्यवृत्ती योजना

राज्यातील अनुसूचित जमातीतील इयत्ता नववी आणि दहावीत शिकणा-या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यनिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी आता केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात येणार आहे. या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.