पॅरीस : वृत्तसंस्था
फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लोकोर्नू आणि त्यांच्या सरकारने सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी राजीनामा दिला. लोकोर्नू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच राजीनामा दिला. फ्रान्समधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला. यामुळे शेअर्स आणि युरोमध्ये मोठी घसरण झाली.
मित्रपक्ष आणि विरोधकांनी नवीन सरकार पाडण्याची धमकी दिल्यानंतर लोकोर्नू यांनी पदाचा राजीनामा दिला. आता विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि संसदीय निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली. लोकोर्नू हे मॅक्रॉन यांचे दोन वर्षाच्या काळातील पाचवे पंतप्रधान ठरले आहेत. ते अवघे २७ दिवस पदावर राहिले आणि त्यांचे सरकार अवघे १४ तास टिकले.
आधुनिक फ्रान्सच्या इतिहासातील हे सर्वांत कमी काळ टिकलेले सरकार ठरले. युरो झोनमधील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला फ्रान्स सध्या त्यांच्या आर्थिक व्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. २०२२ मध्ये मॅक्रॉन पुन्हा निवडून आले. परंतु तेव्हापासून कोणत्याही पक्षाकडे संसदेत बहुमत नाही. त्यामुळे फ्रान्समधील राजकारण कमालीचे अस्थिर बनले आहे.