वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचा २०२५ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षीचा सन्मान जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस या अमेरिकन वैज्ञानिकांना मिळाला. या तिघांना हा पुरस्कार इलेक्ट्रिक सर्किटमधील मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशन या शोधासाठी जाहीर झाला. हा पुरस्कार १० डिसेंबर रोजी होणा-या समारंभात प्रदान केला जाईल.
या वर्षीचा भौतिकशास्त्रातील पुरस्कार क्वांटम क्रिप्टोग्राफी, क्वांटम कम्प्युटर आणि क्वांटम सेन्सर यांसारख्या तंत्रज्ञानाच्या पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. या पुरस्कारात ११ दशलक्ष स्वीडिश क्राउन म्हणजेच सुमारे १.२ मिलियन डॉलर इतकी रक्कम असते, ही रक्कम तिघांमध्ये विभागली जाणार आहे.
दरवर्षी वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांततेचे नोबेल असे सहा पुरस्कार जाहीर केले जातात. सर्व पुरस्कारांचे वितरण समारंभ दरर्षी १० डिसेंबर रोजी होते. हा दिवस अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीशी संबंधित आहे. त्यांचे निधन १० डिसेंबर १८९६ रोजी झाले होते.
क्वांटम तंत्रज्ञानातील नवे पर्व
या संशोधनाने सिद्ध केले की क्वांटम यांत्रिकीचे नियम केवळ अणु पातळीपुरते मर्यादित नाहीत, तर ते मोठ्या मॅक्रोस्कोपिक प्रणालींमध्येही लागू होऊ शकतात. यामुळे सुपरकंडक्टिंग क्विबिट्स, क्वांटम संगणक आणि ऊर्जेच्या सूक्ष्म नियंत्रणाच्या नव्या पद्धती विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हीच ती तंत्रक्रांती आहे, जी आगामी दशकात कृत्रिम बुद्धिमत्ता, एन्क्रिप्शन आणि विज्ञान संशोधन यांची दिशा बदलू शकते.
भौतिकशास्त्राचा नोबेल,
सर्वात प्रतिष्ठित सन्मान
अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार १९०१ पासून नोबेल पुरस्कारांची सुरुवात झाली. डायनामाइटच्या शोधातून मिळालेल्या संपत्तीचा उपयोग त्यांनी या पुरस्कारांसाठी केला. सुरुवातीपासूनच भौतिकशास्त्राचा नोबेल सर्वात पहिला नमूद करण्यात आला होता, ज्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित होते. आजही, फिजिक्स नोबेल विज्ञानजगतातील सर्वोच्च सन्मान मानला जातो.
भौतिकशास्त्राच्या नोबेलचा इतिहास
१९०१ ते २०२४ या कालावधीत भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार एकूण ११८ वेळा प्रदान करण्यात आला असून २२६ वैज्ञानिकांना हा सन्मान मिळाला आहे. या वर्षीचा हा दुसरा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी तीन वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्र क्षेत्रातील योगदानासाठी गौरविण्यात आले होते. गतवर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पायाभूत कामगिरीसाठी जॉन हॉपफील्ड आणि जेफ्री हिंटन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.