अतिवृष्टी, पुरामुळे ६० लाख हेक्टर पिकांचे नुकसान

yongistan
By - YNG ONLINE

 


मुंबई : प्रतिनिधी

 सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जवळपास ६० लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक ठिकाणी अजूनही पुराचे पाणी ओसरले नसल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन सगळी माहिती सरकारकडे येईल. त्यानंतर मदतीचे सर्वंकष धोरण ठरवून पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करण्यात येईल. कोणत्याही स्थितीत दिवाळीपूर्वी सगळी मदत खात्यात जमा झाली पाहिजे, असा आमचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी दिली. 

 ओला दुष्काळ ही संकल्पना अस्तित्वात नसली तरी ज्यावेळी टंचाई परिस्थिती किंवा दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या सवलती देण्यात येतात, त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी २२०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. त्यासंदर्भात चर्चा करून मदतीचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

राज्यात जवळपास ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पहिल्या टप्प्यातील ऑगस्ट पर्यंतचे नुकसान झाले आहे. त्यापोटी २ हजार २१५ कोटी रुपये राज्य सरकारने वितरित करणे सुरू केले आहे. ई केवायसीची अट शिथिल करून अ‍ॅग्रीस्टॅकच्या रेकॉर्डनुसारच हे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.