दीप्ती शर्माचा दीडशे विकेटचा विक्रम
तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था
भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी घोडदौड कायम राखत शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सलग तिसरा सामना जिंकला आणि मालिकेवर आपले नाव कोरले. शफाली ही भारताच्या विजयाची नायिका ठरली. तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला.
श्रीलंकेने तिस-या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ११२ धावा केल्या आणि विजयासाठी भारताला ११३ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान भारताने १३.२ षटकात २ गडी गमावून पूर्ण केले. दीप्ती शर्माने फिरकीच्या जोरावर ४ षटकांत फक्त १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे श्रीलंकेचा संघ बॅकफूटवर गेला.
दीप्ती शर्माने या विकेटसह टी-२० मध्ये १५० विकेट घेतल्या. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली. जागतिक स्तरावर मेगन शटनंतर ही कामगिरी करणारी ती दुसरी गोलंदाज ठरली आहे. शटने १२२ डावांमध्ये १५१ विकेट घेतल्या आणि दीप्तीने १२८ डावांत ही कामगिरी केली. दीप्ती शर्माने केवळ टी-२० मध्येच नाही तर एकदिवसीय सामन्यांमध्येही १५० हून अधिक विकेट घेतल्या. दीप्तीने एकदिवसीय सामन्यांत २ हजारांहून अधिक धावा केल्या. दीप्ती शर्माने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्समध्ये ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू एलिस पेरी हिला मागे टाकले. दीप्तीने २५६ डावांमध्ये ३३३ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. पेरीच्या नावावर ३३१ विकेट्स आहेत. झुलन गोस्वामीच्या नावावर ३५५ विकेट असून हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्सचा विक्रम आहे. हा विक्रमही दीप्ती शर्मा लवकरच मोडेल, असे दिसत आहे.
