छ. संभाजीनगरचा अर्णव महर्षीही सन्मानित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीलाही यावेळी गौरविण्यात आले. शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील २० बालकांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५’ प्रदान केले. शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा क्षेत्रांतील या बालकांना गौरविण्यात आले. यापैकी दोघांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारार्थीमध्ये मध्ये ९ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि सचिव अनिल मलिक उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय अर्णव महर्षी याला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्णव महर्षीने लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांसाठी एआय-आधारित पुनर्वास उपकरण आणि अॅक्टिव्ह हँड रिस्ट बँडचा शोध लावला. अर्णव महर्षी यांनी स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने हे नवोन्मेषी उपकरण विकसित केले. या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.
