क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल

yongistan
By - YNG ONLINE
स्टॉकहोम : २०२३ चा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक क्लॉडिया गोल्डिन यांना घोषित करण्यात आले. रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने त्यांची निवड केली. गोल्डिन यांनी महिला श्रमिक बाजार क्षेत्रात काम केले आहे. 
क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. १९८९ ते २०१७ या काळात त्या नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. एक आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून गोल्डिन यांच्या संशोधनामध्ये महिला कामगार, उत्पन्नातील लिंग अंतर, उत्पन्नातील असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि स्थलांतर यासह विविध विषयांचा समावेश आहे. त्यांचे बरेचसे संशोधन भूतकाळाच्या दृष्टीकोनातून वर्तमानाचा अर्थ लावणे आणि वर्तमानातील समस्यांचे मूळ शोधणे हे आहे. 
त्यांचे सर्वात अलीकडील पुस्तक म्हणजे करिअर अँड फॅमिली : अ सेंच्युरी ऑफ वुमन—द लाँग जर्नी टूवर्ड इक्विटी हे आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांवरील महत्त्वपूर्ण कामासाठी गोल्डिन ओळखल्या जातात. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका क्लॉडिया गोल्डिन यांना श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी आज अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. गोल्डिन यांच्या संशोधनातून अर्थव्यवस्थेतील लैंगिक अंतराबाबत माहिती मिळते. नोबेल समितीने पारितोषिकाच्या घोषणेदरम्यान सांगितले की, गोल्डिन यांच्या संशोधनाने महिलांचे उत्पन्न आणि श्रमिक बाजारातील परिणाम यांचा सर्वसमावेशक लेखाजोखा उपलब्ध करून दिला आहे.

नऊ लाख सात हजार 
डॉलर्स मिळणार
अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा अर्थशास्त्रातील पुरस्कार विजेत्याला १० दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजे सुमारे नऊ लाख सात हजार डॉलर्स दिले जातात. गेल्या वर्षीचा पुरस्कार यूएसस्थित अर्थशास्त्रज्ञ बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डिबिगोंना यांना देण्यात आला. आर्थिक मंदीच्या काळात बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी या तिघांनी संशोधन केले आणि आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी चांगले पर्याय सूचवले होते. त्यांच्या बँक आणि आर्थिक संकटांवरील कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.