विक्रमवीर रोहित शर्मा

yongistan
By - YNG ONLINE
कपिल देवचा ४० वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

 नवी दिल्ली : रोहित शर्माने बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी विश्वकप २०२३ च्या ९ व्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध जोरदार फटकेबाजी करीत सचिनच्या सर्वाधिक षटकारांचा, ख्रिस गेलच्या सर्वाधिक षटकारांचा, विश्वचषकात सर्वात वेगवान एक हजार धावा...यासह कपिल देव यांच्या ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. रोहित शर्माने विश्वकपच्या इतिहासात सर्वांत जलद म्हणजे ६३ चेंडूत शतक ठोकले. याआधी हा विक्रम कपिल देवच्या नावावर होता. कपिल देवने १९८३ च्या विश्वचषकात ७२ चेंडूत शतक ठोकले होते. हा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला. 
रोहित शर्माने आज कर्णधारास साजेशी खेळी करताना शानदार शतक ठोकले. या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी २७३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानांचा पाठलाग करताना रोहित शर्माने ईशान किशनच्या साथीने भारताला शतकी सलामी दिली. रोहित शर्माने आज वन डे कारकिर्दीतील ३१ वे शतक ठोकले. त्याचे हे विश्वचषकातील ७ वे शतक आहे. 

सर्वांत वेगवान शतक
भारतासाठी रोहित शर्माने सर्वात वेगवान शतक ठोकले. त्याने अवघ्या ६३ चेंडूत शतक ठोकले. या शतकाला १२ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा साज आहे. याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी ७२ चेंडूत शतकाला गवसणी घातली होती. ४० वर्षे हा विक्रम अबाधित राहिला होता. रोहित शर्माने हा विक्रम मोडित काढला. 

विश्वचषकात 
सर्वाधिक शतके
विश्वचषकात सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याने विश्वचषकातील सातवे शतक ठोकले. याआधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने विश्वचषकात सहा शतके ठोकली आहेत. आता सचिन तेंडुलकर दुस-या क्रमांकावर पोहोचला. तिस-या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहे. दोघांच्या नावावर ५ शतके आहेत. डेविड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर असून, त्याने ४ शतके ठोकली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही ४ शतकासह पाचव्या क्रमांकावर आहे.  

सर्वाधिक षटकारांचा विक्रम 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माने केला आहे. अफगाणिस्तानविरोधात तिसरा षटकार मारताच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला. त्याच्या नावावर ५५५ षटकारांची नोंद झाली. ४७३ आंतरराष्ट्रीय डावांत ५५५ षटकार ठोकले. त्याने ख्रिस गेलचा ५५३ षटकारांचा विक्रम मोडला.

वर्ल्ड कपमध्ये 
एक हजार धावा  
रोहित शर्माने विश्वचषकातील १ हजार धावांचा टप्पा पार केला. २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषकात रोहित शर्माने खो-याने धावा काढल्या होत्या. त्याने विश्वचषकाच्या १९ व्या सामन्यात एक हजार धावांचा पल्ला पार केला. या अगोदर सचिन तेंडुलकर, विराट  कोहली आणि सौरव गांगुली या तीन भारतीयांनी १ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.