देशात वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात शेतकरी आत्महत्या सातत्याने होतात. राज्य सरकारने याबाबत जनजागृती केली. परंतु शासन, प्रशासनाच्या प्रयत्नाला आजपर्यंत यश आले नाही. आतापर्यंत शेतकरी आत्महत्येच्या घटना वाचून किंवा ऐकून नेहमी धक्का बसायचा. मात्र, आता तर विद्यार्थ्यांपासून शेतक-यांपर्यंत आत्महत्या वाढल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या दहा वर्षांत देशात आत्महत्येच्या प्रमाणात तब्बल ७० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या आत्महत्या ही देशातील फार मोठी समस्या बनू पाहात आहे.
राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्युराने यासंबंधीचा चिंता वाढविणारा अहवाल नुकताच जारी केला. यातून ही धक्कादायक बाब समोर आली. २०२१ मध्ये देशात १, ६४ हजार ३३ आत्महत्या झाल्या. २०२० च्या तुलनेत हे प्रमाण ७.२ टक्क्यांनी वाढले. आतापर्यंत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाणदेखील १० वर्षांत म्हणजे २०११ ते २०२१ दरम्यान ७० टक्क्यांनी वाढले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने नैराश्ये येते आणि या नैराश्येतून अनेक विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या समुपदेशाची गरज बनली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे अधिक सोपे होईल. परंतु शासन किंवा प्रशासन मनापासून प्रयत्न करताना दिसत नाही.
मुळात करिअर, एकटेपणा, दुर्व्यवहार, हिंसा, कौटुंबिक संघर्ष, मानसिक आरोग्य, व्यसनाधिनता, अभ्यासाचा ताण, प्रेमभंग, आर्थिक अपयश, प्रयत्न करूनही कमी गुण यासह इतर कारणांमुळे विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. खरे म्हणजे अपयश ही यशाची पायरी असते. हे आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. परंतु अनेकदा अपयशाच्या भीतीने किंवा अपयश आल्यावर जीवन संपवण्यापर्यंत मजल जाते. यातून मौल्यवान जीवन संपविले गेले आहे. याला वेळीच आळा बसला पाहिजे, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनाला उभारी देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे खूप गरजेचे आहे.
ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रासह पाच राज्ये आत्महत्येमध्ये आघाडीवर आहेत. त्यामध्ये तामिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश असून, या पाच राज्यांत सर्वाधिक आत्महत्या होतात. अर्थात, देशातील ५०.४ टक्के प्रकरणे याच राज्यांत होतात. त्यामुळे या पाच राज्यांत वाढत्या आत्महत्या कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. मात्र, सरकारदेखील याबाबत उदासीन आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये हतबलता वाढत असून, यातूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. परंतु आता विद्यार्थी आत्महत्या रोखल्या पाहिजेत. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.