उत्पन्न घटले, खर्च वाढला

yongistan
By - YNG ONLINE


तुटपुंज्या वेतनामुळे नोकरी सोडण्याची वेळ, पीडब्ल्यूसीचा अहवाल जारी
देशात प्रचंड महागाई वाढली आहे. एक तर बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे तरुणाईच्या हाताला काम नाही. त्यात दिवसभर कष्ट केले तरी तोकडा मोबदला मिळतो. त्यामुळे दैनंदिन खर्चाची हातमिळवणी करता-करता नाकीनऊ येते. यातून कुटुंबकर्त्याला खूप मोठी कसरत करावी लागते. वाढत्या महागाईने कर्मचारीही हैराण झाले आहेत. अनेकांना घर चालवणे कठीण होत आहे. यातून निराशा वाढत असून, तुटपुंजा पगार, त्यात दैनंदिन खर्च भागविणे कठीण असल्याने  अनेकांना नोकरी करावी असे वाटत नाही. प्रत्येक चारपैकी एका कर्मचा-याला काम करावेसे वाटत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

वाढती महागाई आणि त्यात मिळणारा पगार यात ताळमेळ जुळत नसल्याने अनेक खाजगी कर्मचा-यांना नोकरी सोडायची वेळ आली आहे. पीडब्ल्यूसीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली. या अहवालानुसार जगातील प्रत्येक ४ कर्मचा-यांपैकी एका कर्मचा-याला म्हणजे २६ टक्के कर्मचा-यांना नोकरी करावी, असे वाटत नाही. नोकरी सोडून उदरनिर्वाहासाठी दुसरे काही काम करावे, असे वाटत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडब्ल्यूसीने जगभरातील ५३ हजार ९१२ कर्मचा-यांचे सर्वेक्षण केले. त्यातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला. महागाईचा आगडोंब इतका उसळला आहे की, मिळणा-या वेतनात अनेकांना हा खर्च भागविणे कठीण झाले आहे. दैनंदिन खर्च भागत नसल्याने ईएमआय भरण्याचा तर प्रश्नच येत नाही. अर्थात, ईएमआय भरायला ते सक्षम नाहीत. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्याासठी सातत्याने कष्ट घेत आहेत. नोकरीच्या ठिकाणी खूप मेहनत घेत आहेत. मात्र, कमी मोबदल्यामुळे घर खर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांंच्या डोक्यात नोकरी सोडण्याचा विचार येतो. यातून अनेकजणांनी जॉब सोडून उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

 या अहवालानुसार ब्रिटनमधील ४७ टक्के कर्मचा-याच्या मते, महिन्याच्या शेवटी त्यांचा संपूर्ण पगार खर्च होतो. त्यांच्याकडे बचत करण्यासाठी काहीच उरले नाही. यातील १५ टक्के कर्मचा-यांचा असा विश्वास आहे की, ते काम करत असलेल्या पगारासह घरातील सर्व बिले अदा करू शकत नाहीत. नोकरी करून दैनंदिन खर्चच भागत नसेल, तर नोकरी करण्यात अर्थ काय, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यामुळे जगभरात अनेक जण नोकरी सोडून व्यवसायाच्या मागे  लागले आहेत. मात्र, व्यवसायात भरभराट कधी यावी आणि भविष्य कधी उज्ज्वल व्हावे, असा प्रश्न नोकरदार वर्गाला पडत आहे. मात्र, बहुतेक लोक आपली नोकरी सोडून स्वत:चा व्यवसायकिंवा काम करण्यावर अधिक भर देत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आर्थिक अनिश्चिततेचा काळ आहे. त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहून सावध पावले टाकली पाहिजेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

इच्छा असूनही अनेकांना
नोकरी सोडता येत नाही
घरखर्चात हातमिळवणी करता-करता फार मोठी कसरत करावी लागते. कुटुंब प्रमुख, कर्मचा-यांना नोकरी सोडण्याची इच्छा असतानाही ते नोकरी सोडू शकत नाहीत. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक संकटामुळे २६लाख लोकांनी आपल्या नोक-या गमावल्या होत्या. देशात अनेक कर्मचारी कमी पगारावर काम करत आहेत. त्यांना मिळालेल्या पगारात घर चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांनी नोकरी करावी असे वाटत नाही.
युवराज नांगरे, सांगली