मानवाधिकाराच्या लढ्याचा सन्मान

yongistan
By - YNG ONLINE
स्टॉकहोम : इराणमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठविणा-या आणि तेथील महिलांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढत असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. नर्गिस मोहम्मदी या गेल्या अनेक वर्षांपासून इराणमध्ये मानवी हक्क आणि स्त्रियांवरील अत्याच्यारांविरोधात लढत आहेत. त्यांच्या लढ्याचा सन्मान म्हणून त्यांना  २०२३ चे शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले. फ्रंट लाइन डिफेंडर्स राइट्स ऑर्गनायजेशन या संघटनेसाठी त्या काम करतात. या संघटनेच्या माध्यमातून इराणमध्ये त्यांनी हा लढा उभारला.

नर्गिस मोहम्मदी यांना इराण सरकारने आतापर्यंत १३ वेळा अटक केली. पण त्या थांबल्या नाहीत. उलट प्रत्येक कारवाईनंतर त्या अधिक आक्रमक होऊ लागल्या. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना १५४ चाबकाचे फटके मारण्याची शिक्षादेखील झाली. या शिक्षेला त्यांनी हसत-हसत तोंड दिले. तसेच त्यांना ३१ वर्षांच्या तुरंगवासाचीही शिक्षा झाली. आजही त्या तेहरानच्या एव्हिन तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे त्या शांततेचा सन्मान स्वीकारायलाही जाऊ शकत नाहीत. 

इराणमधील महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्या इराणी राजवटीविरोधात लढा देतात. मोहम्मदी या इराणी महिलांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावणा-या नियमांना आव्हान देतात. त्याविरोधात त्यांनी अनेकदा आंदोलने केली, आवाज उठवला. त्यांच्या या लढ्याचा नोबेल समितीने शांततेचे नोबेल देऊन सन्मान केला.

यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३५१ उमेदवार होते. त्यापैकी २५९ व्यक्ती आणि ९२ संस्था आहेत. सलग ८ वर्षांपासून उमेदवारांची संख्या ३०० च्या वर गेली आहे. यावर्षी नोबेल पुरस्काराच्या मानांकनाच्या यादीत वकील कोहसार, नर्गेस मोहम्मदी फाऊंडेशन, अफगाण महिला कार्यकर्त्या मेहबूबा सेराज, इराणी हक्क प्रचारक नर्गेस मोहम्मद, यांची नावे समाविष्ट होती. १९०१ मध्ये फ्रेडरिक पासी आणि हेन्री ड्युनांट यांना पहिल्यांदा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

कोण आहेत नर्गिस मोहम्मदी?
५१ वर्षीय नर्गिस मोहम्मदी इराणमध्ये मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी जोरदार आवाज उठवतात. सध्या त्या तेहरानमध्ये एविन तुरुंगात १० वर्षांची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप आहे. गेल्या ३० वर्षांत नर्गिस मोहम्मदी यांना त्यांचे लेखन आणि अन्यायाविरोधात हालचालींबद्दल सरकारने अनेकदा शिक्षा केली. न्यायव्यवस्थेने मोहम्मदींना पाच वेळा दोषी ठरवले आणि १३ वेळा अटक केली आहे.  

गेल्या वर्षीचे मानकरी
गेल्या वर्षी २०२२ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसचे  ुमन अ‍ॅक्टिव्हीस्ट अ‍ॅलेस बिलियात्स्की आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल तसेच युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला होता.